संग्रहित छायाचित्र
संजय शिंदे: महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार म्हणजेच चार सदस्यीय पद्धतीने होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीसह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आरपीआय व इतर पक्षही तयारी करत आहेत. गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने एकतर्फी विजय मिळवत ७७ जागा मिळवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने (एकसंघ) पंचवीस वर्षांची सत्ता गमावली होती. शिवसेनेला (एकसंघ), तर हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या जागा मिळाल्या होत्या. राज्यात महायुती म्हणून सत्तेवर असलेल्या राज्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये एकत्रित असणाऱ्या भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांची महत्त्वाकांक्षा, भाजपचा 'अब की बार शंभर पार', राष्ट्रवादी काँग्रेसचा (अजित पवार) भाजपच्या हिंदुत्ववादाला असणारा विरोध लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुक 'महायुती' म्हणून लढवायची की स्वतंत्रपणे, याबाबत कार्यकर्त्यात संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये एकूण ३२ प्रभागात १२८ नगरसेवक आहेत. त्यामध्ये पक्षीय बलाबल भाजप ७७, राष्ट्रवादी काँग्रेस ३६, शिवसेना ०९, अपक्ष ०५, मनसे ०१ असे होते. २०१७ ते २०२२ असा पाच वर्षांचा कालखंड संपल्यानंतर महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. जवळपास साडेतीन ते पावणेचार वर्षे निवडणूक झाली नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक चार सदस्य पद्धतीनेच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यादृष्टीने महापालिका निवडणूक प्रशासन कामाला लागले आहे. तसेच, शहरातील सर्च पक्षांनी तयारी सुरू केली आहे. शहरात महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा समावेश आहे. यांच्यासह मनसे, आप, आरपीआय व इतर लहान पक्षही शहरात कार्यरत आहेत. मात्र, मुख्य लढत ही महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांतच होणार आहे.
पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, प्रदेश युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष व माजी खासदार अमर साबळे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे हे नेतृत्व करत आहेत. २०१७ निवडणुकीमध्ये १२८ पैकी ७७ नगरसेवक निवडणूक आणत महापालिकेवर कमळ फुलवले होते. पालकमंत्री अजित पवार यांची पंचवीस वर्षांची सत्ता त्यांनी नेस्तनाबूत केली होती. त्यामुळे होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये ही सर्वाधिक जागांची त्यांची मागणी आहे. केंद्रात आणि राज्यात नंबर एकचा पक्ष म्हणून भाजप आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही भाजपकडे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे १२८ जागांपैकी सर्वाधिक जागा या आम्हालाच पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असणार हे निश्चित आहे. २०२२ च्या निवडणुकीसाठी 'अब की बार शंभर पार' हा नारा त्यांनी दिला होता. मात्र निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आता त्या होत असल्याने त्यांनी तोच नारा देणे सुरू केले आहे.
राष्ट्रवादीसमोर अस्तित्व राखण्याचे आव्हान
महायुतीतील दुसरा घटक पक्ष आणि ज्या पक्षाने पिंपरी-चिंचवडमध्ये जवळपास २५ वर्षे अधिराज्य गाजवले, त्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर आता स्वतःचे अस्तित्व राखण्याचे आव्हान आहे. राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. या पक्षामध्ये विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे यांच्यासह तळागाळापर्यंत शेकडो कार्यकर्ते आहेत. त्यात नुकतेच पार पडलेल्या वर्धापनदिनामध्ये पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश दिले आहेत. आम्हाला कट्टर हिंदुत्ववाद मान्य नाही, आम्ही विचारांशी तडजोड केलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. जरी आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला तरी हा शोषित, वंचित, मागासवर्गीय, तसेच अल्पसंख्याक समाजासाठी काम करणारा पक्ष आहे. जातीय द्वेष, धार्मिक द्वेष तसेच कोणत्याही हिंसेला पक्षात स्थान नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केल्यामुळे पिंपरी-चिंचवड भाजप कार्यकर्त्यांमध्ये या वक्त्यव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक पिंपरी-चिंचवड शहरात महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र, याबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मतेमतांतरे दिसून येत आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 'आमचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल' असे जाहीर केले आहे. मात्र महायुतीतील इतर घटक पक्षांना निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची असेल तर त्यासाठी आम्हीही तयार आहोत, अशी भूमिका कार्यकर्त्यांमध्ये आहे.