संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सलग दोन दिवस मंगळवारी (दि. २०) दुपारी मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. दुपारी साडेतीनच्या सुमारास दाटून आलेल्या ढगांच्या गडगडाटासह तुफान पाऊस पडला. शहरासह परिसरात अवघ्या काही मिनिटांत रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. अचानक सुरू झालेल्या या पावसाने रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांची दाणादाण उडवली. निगडी प्राधिकरणासह अनेक भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे महापालिकेच्या ड्रेनेज लाईन, स्ट्रार्म वॉटर लाईन सखल भागातील पाणी वाहून न गेल्याने पाणी साचून राहिले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात सोमवार (दि. १९) आणि मंगळवारी (दि. २०) सलग दोन दिवस अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. सकाळी कडक उन्हाचा तडाखा आणि दुपारी विजेच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाल्याने सर्वत्र पाणी पाणी झाले आहे. सुमारे एक तास झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. मुसळधार पावसामुळे समोरचे दिसत नव्हते. रस्ते जलमय झाले होते. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक सखल भागात पाणी साचले होते. वाहनचालकांना मार्ग काढताना अंदाज येत नव्हता. परिणामी, अनेक भागात वाहतूक संथगतीने मार्गस्थ होत होती.
सकाळपासून पडलेल्या कडक उन्हामुळे वातावरण तापले होते. वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले. दुपारी तीनच्या सुमारास अचानक आभाळ दाटून आले होते. त्यानंतर ढगांच्या गडगडाटासह टपोऱ्या थेंबांचा वर्षाव सुरू झाला. जवळपास एक तासाहून अधिककाळ पाऊस सुरू होता. पावसाला सुरुवात होताच अवघ्या काही मिनिटांतच रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले. तसेच, उपनगरांतील सखल भागांत तळ्याचे स्वरूप आले. या पावसाने चाकरमान्यांची धांदल उडाली. बसथांब्याच्या आडोशाला प्रवाशांची एकच गर्दी केली. पायी जाणाऱ्या नागरिकांनी ऑटो रिक्षाचा आधार घेतला तर दुचाकीस्वारांनी भिजत जाणे पसंत केले.
पावसाचा जोर वाढताच रस्त्यावरील आणि चौकातील फळे, भाजीविक्रेते, पथारीवाल्यांनी गाशा गुंडाळला. पादचाऱ्यांची मात्र त्रेधा उडाली. निगडी, आकुर्डी पिंपरी, चिंचवड स्टेशन व कासारवाडी दरम्यान रस्त्यावर पाणी साचले. पिंपरी-चिंचवडसह निगडी, आकुर्डी, चिखली, संभाजीनगर, भोसरी, इंद्रायणीनगर, कासारवाडी, सांगवी, दापोडी, पिंपळे सौदागर, वाकड आदी उपनगरांतही मुसळधार पाऊस झाला. मात्र, काही ठिकाणी पावसाचा जोर कमी होता. तळवडे, चिखली, मोशी भागातही जोरदार पाऊस पडला आहे.
अनेक घरात शिरले पाणी
अवकाळी पावसामुळे एका तास सर्वत्र पाणी केले. निगडी प्राधिकरणात सोमवारी झालेल्या पावसाने सेक्टर २६, २८ मधील शेकडो घरात पाणी शिरले. यामध्ये ध्रुव दर्शन सोसायटी, परमार पार्क, निगडी चौक अनेक भागात पाणी साचले होते. अचानक झालेल्या पावसाने ड्रेनेज लाईन तुंबली आहे. ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यास खूपच दुर्गंधी सुटली होती. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हाऊसिंग सोसायटी या रहिवाशी सोसायटीमधील नागरिकांना पावसाचा तडाखा बसून घरात पाणी घुसण्याचे प्रकार घडले आहेत. अचानक जोरदार मुसळधार पाऊस सुरु झाला. त्या पावसाने नागरिकांची एकच धावपळ झाली. चिंचवड, लिंकरोड, आकुर्डी भागात अनेक घरासमोर सखल भागात पाणी साचले होते. एक तासाहून अधिक पाऊस पडल्याने अनेक भागात पावसाचे पाणी साचून राहिले होते. पण, घरासमोर लावलेली वाहने पावसाच्या पाण्यात अडकली होती. तसेच चिंचवड लिंकरोड भागात सखल भागात पाणी साचून राहिले होते. त्या पाण्यातून महिला वाट काढताना रस्ता दुभाजकावर अडकून पडल्या होत्या.
ड्रेनेजच्या पाण्याने दुर्गंधी
शहरात सलग दोन दिवस झाले जोरदार पाऊस सुरु झाला आहे. यामध्ये पिंपरीत अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पावसाचे पाणी घरात शिरले होते. ड्रेनेजचे पाणी घरात शिरल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. या पावसाच्या पाण्यात मिक्स होऊन ड्रेनेजचे पाणी घराघरात पाणी गेले, महापालिकेने पावसापूर्वी कुठलीच दक्षता घेतली नसल्याचे दिसून आले आहे. गोरगरीब जनतेचे साठवलेली धान्य व इतर मोठे नुकसान झालेले आहे. शेकडो झोपडपट्ट्याच्या भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
चार ते पाच झाडे उन्मळून पडली
शहरात आज झालेल्या मुसळधार पावसाने हवेत गारवा निर्माण झाला आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसाने, थेरगाव, पिंपरी, चिंचवड, चिखली आणि जगताप डेअरी चौकात अशी चार ते पाच झाडे उन्मळून पडली आहेत. झाडे पडून दुचाकींचे नुकसान झाले आहे.
मुसळधार झालेल्या पावसामुळे थेरगावमधील कन्हैया पार्क, बेलठिका नगर मुख्य रस्त्यावर पाणी साचून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला होता. त्या ठिकाणी सकाळी २ लहान मुलींना शॉक लागण्याची घटना घडली, प्रसंगावधान दाखवल्याने त्या दोघी थोडक्यात बचावल्या आहे. महावितरणने परिसरातील केबल कट सापडला. तातडीच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. जागरूक नागरिकांमुळे मोठा अपघात टळला आहे. -अनिकेत प्रभू, सामाजिक कार्यकर्ते
निगडीच्या सेक्टर २६, २८ मधील काही सोसायटीत मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी घरात शिरले आहे. नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही. कागदावरच आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करणारी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी दिसत नाहीत. निगडी प्राधिकरणात ड्रेनेज लाइनचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. हे महापालिका प्रशासनाला माहिती असूनदेखील प्रशासनाने यावर काहीच उपाय योजना केलेल्या नाहीत. ड्रेनेज लाईनच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहून त्या ड्रेनेज लाइनची साफसफाई झालेली नाही.- बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते