नळजोडणीवरील पाण्याच्या मीटरची वाढली चोरी
शहरातील सोसायट्यांमध्ये नळजोडणीवरील पाण्याच्या मीटरची चोरी वाढली आहे. हे मीटर पितळ आणि ब्राँझ धातूपासून बनवलेले असते. त्याला भंगारमध्ये चांगले पैसे मिळतात. त्यामुळे चोरटयांनी या मीटरवर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. समाविष्ट गावातील विविध सोसायट्यांमध्ये मीटर चोरीचे प्रमाण वाढल्यामुळे सोसोटीधारकांना ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या संकटासहित आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
सोसायटीतील १२ फ्लॅटच्या पाठीमागे कमीत कमी एक इंची कनेक्शन दिले जाते. त्यानुसार एका विंगमध्ये किती फ्लॅट आहेत आणि एकूण स्कीममध्ये एकूण फ्लॅटची संख्या पाहून नळजोडणी करण्यात येते. त्यावर सोसोयटीधारकांनी किती पाणी वापरले आहे, त्याचे मोजमाप करण्यासाठी त्या नळजोडणीवर पाणी पुरवठा विभागाच्या वतीने मीटर जोडले जातात. हे मीटर पितळ किंवा ब्राँझ धातूचे बनवलेले असतात. त्यामुळे एक मीटरची किंमत अंदाजे ६ ते ७५०० रुपये एवढी असते. आणि ती बसवण्यासाठी जवळपास अडीच ते तीन हजार असे एकूण नऊ ते दहा हजार रुपये मोजावे लागतात, अशी माहिती यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने दिली आहे.
हे मीटर ज्या धातूपासून बनवतात त्या पितळ आणि ब्राँझ धातूला भंगारमध्ये एका किलोमागे किमान ४५० ते ६०० रुपये भाव मिळत असल्याची माहिती आहे. त्यामुळे चोरटयांनी या मीटरवर लक्ष केंद्रित केले आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या समाविष्ट गावामध्ये मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. त्याठिकाणी फ्लॅट्सची संख्या मोठी असते. त्याअनुषंगाने येथे पाण्याचे नळजोड आणि त्यावरील मीटरची संख्या ही जास्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. मोठे गृहप्रकल्प असणाऱ्या सोसायट्यांमध्ये लक्ष ठेवून नळजोडणीवरील मीटर चोरण्यास चोरांनी प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. मोशी भागातील बारणे वस्ती येथील विविध सोसायट्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्याचबरोबर पुणे-नाशिक हायवे च्या दोन्ही बाजूच्या सोसोयट्यामध्ये प्रकार घडल्याचे समजते.
सदनिकाधारकांना आर्थिक भुर्दंड
रात्रीच्या वेळी चोरटे मीटर चोरी करत आहेत. जलवाहिनीचे नुकसान न करता फक्त जेथे मीटर आहेत ते लॉक उचकटून फक्त मीटर चोरी करणारे हे त्या कलेत तरबेज असणार यात तिळमात्र शंका नाही. मीटर चोरीला गेल्यामुळे त्याठिकाणी दुसरे मीटर बसवण्यासाठी पालिका प्रशासन तगादा लावत आहे. मीटरशिवाय नळजोड असल्यास पाण्याची चोरी होऊ शकते. त्यामुळे सोसायटीधारकांना पाणी पुरवठा विभागाकडून दंड होऊ शकतो, या भीतीने पुन्हा नवीन मीटर बसवण्यासाठीचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
नळजोडणीवरील मीटर चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरटे हे सराईत आहेत. चोरी करताना फक्त मीटरकडे त्यांचा कल दिसत आहे. इतर नळजोडणीला हात न लावता फक्त व्यस्थितपणे मीटर काढण्यात ते पटाईत दिसत आहेत. या घटना आमच्या भागात वाढल्या आहेत. आमच्या सोसायट्यामध्ये अगोदर सहा नंतर तीन असे एकूण नऊ मीटर चोरीला गेले आहेत.
- नयन पाटील, प्रिस्टीन ग्रीन्स सोसोयटी, मोशी