हवा आणि ध्वनिप्रदूषणाच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणे भोवले
हवा प्रदूषण करत पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकाम प्रकल्पांच्या कामाला बांधकाम विभागाने स्थगिती दिली आहे. त्यातील दोन बिल्डरांवर तब्बल पावणेदोन लाख रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. महापालिकेने हवा आणि ध्वनिप्रदूषण करून पर्यावरण नियमांचे उल्लंघन करत उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डरांवर प्रथमच कारवाईचा बडगा उगारला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात नागरीकरण वेगाने होत आहे. त्यामुळे बांधकाम प्रकल्पांची संख्यासुद्धा झपाट्याने वाढत आहे. शहरातील वाढते औद्योगिकीकरण, बांधकामांमुळे हवा व ध्वनिप्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच हवेचा निर्देशांक खराब होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.
महापालिकेने नागरिकांना चांगले जीवनमान देण्याच्या हेतूने शाश्वत, पर्यावरणपूरक बांधकाम पद्धती स्वीकारली आहे. याकरिता महापालिकेने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार औद्योगिक आणि बांधकाम प्रदूषणावर पाळत ठेवणारी यंत्रणा नेमण्यात आली. ३२ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह आठ वॉर्डांमध्ये, उल्लंघनाच्या सदैव निरीक्षणासाठी यंत्रणेचे कर्मचारी तैनात करण्यात आले. त्यानुसार शहरातील हवा, ध्वनी आणि जल प्रदूषण करत पर्यावरण नियमांचे उल्लंघन करण्यावर कडक कारवाईचे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले होते.
त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून वाकड येथील सर्व्हे नंबर २२६/१ब/१क मधील भूखंडावर विकसक मे. अंशुल सिध्दी प्रमोटर्सतर्फे दीपक विलास जगताप यांचे अंशुल कासा बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी २९ डिसेंबर २०२४ बांधकाम अधिकाऱ्यांनी स्थळ पाहणी केली. त्यानुसार बांधकामाच्या ठिकाणी हवाप्रदूषण नियंत्रक उपाययोजनांची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली असून बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे. तसेच आकुर्डी येथील सर्व्हे नंबर १४७ /१/२ या ठिकाणी श्री कृष्णा वंडर प्राॅपर्टीजतर्फे अरुण प्रेमचंद मित्तल व इतर यांच्या बांधकाम प्रकल्पाचे काम सुरू आहे. बांधकाम व्यावसायिकांना मूळ व सुधारित बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार स्थळ पाहणी केल्यानंतर संदर्भ क्रमांक ५ मधील उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिका बांधकाम विभागाकडून नोटीस बजावण्यात आली. त्यात बांधकाम व्यावसायिकांना तब्बल ४३ हजार ५०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधित बिल्डरांनी दंड महापालिका कोषागारात भरलेला नाही. त्यामुळे त्यांच्याही बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे.
आकुर्डी येथील सर्व्हे नंबर १४७ /१ व २ या ठिकाणचे विकासक मे. मंत्रा स्काय टाॅवर्स यांच्याही बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे. बांधकामाच्या ठिकाणी हवा व ध्वनिप्रदूषण रोखण्याबाबत योग्य त्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित मे. मंत्रा स्काय टाॅवर्सला तब्बल एक लाख ३० हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकानेही दंड कोषागारात भरलेला नाही. त्यामुळे बांधकामाला स्थगिती देण्यात आली आहे.
दरम्यान, महापालिकेने हवेच्या गुणवत्तेचा सुधारण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईसह कामाला स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शहरातील वाकड, आकुर्डी, येथील बांधकाम स्थगिती दिली आहे. संबंधित बांधकाम व्यावसायिकांना हवा खराब होऊ नये. ध्वनिप्रदूषण होऊ नये. याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
हवा गुणवत्ता निर्देशांकाचा कृती आराखडा
टप्पा १ - (हवा गुणवत्ता निर्देशांक १०१ - ३००) : रस्त्यावरील धूळ नियंत्रित करणे, बेकायदेशीर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, वाहतूक व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार.
टप्पा २ - (हवा गुणवत्ता निर्देशांक ३०१ - ४००) : डिझेल जनरेटरवरील निर्बंध, रस्त्यांची स्वच्छता आणि सार्वजनिक वाहतुकीचा प्रचार यांचा समावेश आहे.
टप्पा ३ - (हवा गुणवत्ता निर्देशांक ४०१- ५००) : अत्यंत प्रदूषण करणारे उद्योग बंद करण्यात येणार, वाहनांचे प्रतिबंधात्मक क्षेत्र तयार करून उल्लंघनावर कठोर दंड आकारण्यात येणार.
टप्पा ४ - (हवा गुणवत्ता निर्देशांक ५०० हून अधिक) : प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहन बंदी, संभाव्य शाळा बंद आणि कडक दंड लागू करण्यात येणार.
१० टक्के वस्तूच्या पुनर्वापराची सक्ती
महानगरपालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोत बांधकाम आणि बांधकाम राडारोडा व्यवस्थापन प्रकल्प (सी अॅण्ड डी वेस्ट मॅनेजमेंट) आहे. या बांधकाम राडारोड्यातून दररोज १५० मेट्रिक टन बांधकाम कचर्यावर प्रक्रिया केली जाते. नवीन नियमानुसार बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या प्रकल्पातून मिळणार्या किमान १० टक्के पुनर्प्रक्रिया केलेल्या वस्तू वापरासाठी घेणे बंधनकारक केले आहे. या नियमाचे बांधकाम व्यावसायिकांनी पालन न केल्यास त्यांना भोगवटा प्रमाणपत्र (बिल्डिंग कंप्लेशन सर्टिफिकेट) दिले जाणार नाही, असा नवीन नियम करण्यात आला आहे.
हवा व ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून बांधकाम व्यावसायिकांना योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. बांधकाम परवानगी देताना संदर्भ क्रमांक ५ मधील आदेशानुसार बांधकाम करणे अपेक्षित आहे. त्यानुसार हवा प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत आहे. चालू असलेल्या बांधकाम ठिकाणी कुठल्याही प्रकारची हवा प्रदूषण नियंत्रण उपाययोजना नसल्यास बिल्डरांवर दंडात्मक कारवाईसह बांधकामांना स्थगिती देण्यात येईल.
- मकरंद निकम, शहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका