Pimpri-Chinchwad: उद्योगनगरीत महामानवाला अभिवादन

भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. शहरातील चौकाचौकात लावण्यात आलेले निळे झेंडे, डॉ. आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम, सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणूका अशा उत्साही वातावरणात उद्योगनगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 15 Apr 2025
  • 12:44 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

उद्योगनगरीत महामानवाला अभिवादन

मुख्य प्रशासकीय इमारतीत आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी केले अभिवादन; बोपखेलमधील रामनगर येथे भारतीय संविधानाचे वाटप

भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पिंपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आले. शहरातील चौकाचौकात लावण्यात आलेले निळे झेंडे, डॉ. आंबेडकर जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम, सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणूका अशा उत्साही वातावरणात उद्योगनगरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस, भीमसृष्टी, एच. ए कॉलनी आणि दापोडी येथील पुतळ्यास आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पिंपरीतील भीमसृष्टी येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला महापालिका अधिकाऱ्यांसोबत विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, ॲड. गोरक्ष लोखंडे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार गौतम चाबुस्कवार, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे आदी उपस्थित होते. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेले अधिकार व कर्तव्य याबाबत जनजागृती व्हावी, नागरिकांनी राज्यघटनेचा अभ्यास करावा या हेतूने बोपखेलमधील रामनगर परिसरात सोमवारी (ता.१४) भारतीय संविधानाच्या ५१ प्रतींचे वाटप कररून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.  जीवनदान ट्रस्टच्या अध्यक्षा सुमन सोनवणे, उपाध्यक्षा निलीमा जाधव, ओमकार सोनवणे, अशोक बाराथे, विद्वान गायकवाड, किरण पाटोळे आदी उपस्थित होते यावेळी भाग्यदेव घुले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संतोष गायकवाड यांनी आभार मानले.

झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने अभिवादन

पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे उपाध्यक्ष हरिभाऊ वाघमारे, गौतम लोंढे, चंद्रकांत कांबळे, किरण वंजारी, नाना थोरात, अर्जुन दाखले यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मराठा सेवा संघाच्या वतीने कार्यक्रम

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि जिजाऊ ब्रिगेड यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिजाऊ ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकारी सुनिता शिंदे, वृषाली साठे, सुलभा यादव, माणिक शिंदे, शीतल घरत, उज्ज्वला साळुंखे, संध्या भालेराव यांनी पुष्पहार अर्पण केला.यावेळी मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव, अॅड लक्ष्मण रानवडे, अशोक सातपुते, वसंत पाटील, प्रकाश बाबर, वाल्मिक माने, अनिल करंजेकर, प्रविण कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

गंगानगर येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त मातोश्री रमाबाई महिला मंडळाच्या वतीने गंगानगर प्राधिकरण येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्ष मीना जावळे, विजया बनसोडे, सुजाता बनसोडे इतर सर्व महिला कार्यकर्त्या व पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रमणी जावळे यांनी केले.

Share this story

Latest