फिटनेस विलंब शुल्कापासून लवकरच मिळणार मुक्तता ?
पंकज खोले :
वाहनयोग्यता प्रमाणपत्र घेण्यास उशीर झालेल्या रिक्षा, टॅक्सीसह वाहतूक, मालवाहतूक, प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना विलंब फी आकारली जात आहे. या विरोधात वाहतूक संघटना आक्रमक झाल्या असून, हा दंड रद्द करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत यावर तोडगा काढण्याची संघटनांनी मागणी केली. केंद्रीय रस्ते दळणवळण वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन याबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
पुणे शहरातील ऑटो रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडेही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्रीय पातळीवर पाठपुरावा करण्यास सुरुवात केली आहे. आरटीओच्या मनमानी कारभाराविरोधात निवेदन दिले. तसेच ऑटो टॅक्सी, रिक्षा चालकांचे विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्य मंत्रिपदी नियुक्ती झाल्याबद्दल मुरलीधर मोहोळ यांना शुभेच्छा दिल्या. तसेच ऑटो टॅक्सी, रिक्षा, बस यासह प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक-मालकांच्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडून शासन दरबारी न्याय देण्याची मागणी केली. नुकतेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) विलंबाने वाहन प्रमाणपत्र नूतनीकरण करणाऱ्या वाहनांवर दंडाचा बडगा उगारला आहे. प्रतिदिन पन्नास रुपये असा दंड सर्वांवर अन्यायकारक आहे. तो लागू केला असून, त्यासाठी ज्यादा पैसे भरावे लागत आहेत. अनेकांना लाखो रुपये भरण्याची वेळ येणार आहे. हातावरचे पोट असणाऱ्या या प्रवासी वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे अशक्य आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने घेतलेला हा निर्णय त्वरित रद्द करावा, त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली.
लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊ. या बैठकीत हा प्रश्न सोडवू, असे आश्वासन यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिले. या शिष्टमंडळात ऑटो टॅक्सी, बस, रिक्षा ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे, पुणे फेडरेशनचे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक आनंद तांबे, मनसे वाहतूक विभाग पुणे शहराध्यक्ष किशोर चिंतामणी, विद्यार्थी वाहतूक संघटनेचे बापू भावे, भाजप रिक्षा वाहतूक आघाडीचे अंकुश नवले, आम आदमी पक्षाचे एकनाथ ढोले, शिवनेरी रिक्षा संघटनेचे आबा बाबर, एम आय एम रिक्षा संघटनेचे अध्यक्ष बाबा सय्यद, राष्ट्रवादी सेवा संघाचे विजय रवळे, तुषार पवार, महाराष्ट्र रिक्षा पंचायत पुणे शहराध्यक्ष मुंबईचे कार्याध्यक्ष विलास केमसे पाटील आदींसह रिक्षा चालक-मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.