Pimpri-Chinchwad: मोशी मध्ये दहा दुकानांना भीषण आग; लाखोंचे नुकसान

मोशी येथील लक्ष्मी चौकात रविवारी (११ मे) सायंकाळी दहा दुकानांना आग लागली.

मोशी येथील लक्ष्मी चौकात रविवारी (११ मे) सायंकाळी दहा दुकानांना आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील लक्ष्मी चौकात पत्र्याचे शेड बनवून दुकाने थाटण्यात आली आहेत. या ठिकाणी रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. यामध्ये गादी कारखाना, पूजा भांडार, सायकल दुकान, काच दुकान, किराणा साहित्याचे दुकान, पेंट दुकान अशी दुकाने आहेत. या दुकानांमध्ये आग पसरली. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एका दुकानातील रोख रक्कम देखील जळाली आहे.

अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या सर्व आठ फायर स्टेशन मधील वाहने घटनास्थळी दाखल झाली. तसेच दोन खासगी टँकर देखील मदतीला आले. सुमारे अडीच तास पाणी मारून आग आटोक्यात आणली. पेंटच्या दुकानातील रासायनिक पेंट मटेरियल सुरक्षित केल्याने मोठा धोका टळला आहे. हवेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली. तसेच धुराचे लोट परिसरात पसरले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

Share this story

Latest