पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मौजे चिखली-कुदळवाडीतील प्रस्तावित टीपी स्कीम कार्यवाही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासनाने महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली. त्यामुळे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला यश मिळाले असून ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांना दिलासा मिळाला आहे.
चिखली, चऱ्होली येथील प्रस्तावित टीपी स्कीमबाबत भाजप आमदार महेश लांडगे यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. त्यावेळी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला होता. गुरूवारी (दि. १५) प्रशासनाने सर्वसाधारण सभेत याबाबतच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहराच्या स्थापनेपासून तीन ते चार वेळा आमच्या भूमिपुत्रांच्या जमिनींचे शासनाच्या वतीने भूसंपादन करण्यात आले आहे. १९७० च्या दरम्यान औद्योगिक विकास महामंडळाने उद्योगधंद्यांसाठी भूसंपादन केले, हा पहिला अन्याय झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची स्थापना करून आमचा विरोध असतानाही जमिनी ताब्यात घेतल्या. टाटा मोटर्स कंपनीच्या विस्तारासाठी पुन्हा आमच्या जमिनींवर भूसंपादनाची कारवाई केली. प्रत्येकवेळी भूमिपुत्रांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे या भागात टीपी स्कीम लागू करू नये, अशी आग्रही भूमिका प्रशासनासमोर मांडली. त्याला यश मिळाले आहे.’’
आता चऱ्होलीतील भूमिपुत्रांसाठी लढणार : आमदार महेश लांडगे
मौजे चिखलीतील प्रस्तावित टीपी स्किम प्रशासनाने रद्द केली. मात्र, अद्याप मौजे चऱ्होलीतील प्रस्तावित टीपीबाबत निर्णय झालेला नाही. याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह ग्रामस्थ, भूमिपुत्र यांची बाजू ऐकूण घेणार आहेत. त्यासाठी आयुक्त-ग्रामस्थ यांची श्री वाघेश्वर महाराज मंदिरात लवकरच बैठक घेण्यात येईल. भूमिपुत्रांचा टीपीला विरोध का आहे, याबाबत सर्वसमावेशक चर्चा करण्यात येईल. स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात येईल, अशी प्रशासनाची भूमिका आहे. मात्र, चऱ्होलीची टीपी स्कीमसुद्धा चिखली-कुदळवाडीप्रमाणे रद्द करावी, अशी नागरिकांची ठाम मागणी आहे, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.