संग्रहित छायाचित्र
गेल्या आठ दिवसांपूर्वी तांत्रिक कारणाअभावी विस्कळीत झालेले शिधापत्रिका कार्यालयातील कामकाज पूर्ववत झाले आहे. तांत्रिक दुरुस्ती केल्यानंतर अन्न धान्य वितरण व पुरवठा विभागाच्या संकेतस्थळाचे कामकाजातील अडथळा दूर झाला आहे. नवीन शिधापत्रिका डाऊनलोड होत आहेत. मात्र आता रखडलेल्या कामाचा निपटारा करण्यासाठी अधिकाऱ्यांना अधिक काम करावे लागणार आहे.
शिधापत्रिका काढण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने शिधापत्रिकेची प्रक्रिया ऑनलाईन केली आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर (rbmr.mahafood.go©t.in) ही सोय उपलब्ध आहे. शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली (आरसीएमएस) विकसित करून त्याद्वारे कामकाज केले जात होते. नवीन शिधापत्रिका काढणे, नावे वाढवणे, कमी करणे, विभक्त करणे अशी विविध कामे करण्यासाठी या ऑनलाईन प्रणालीचाच वापर होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून संबंधित संकेतस्थळ तांत्रिक अडचणींमुळे हळू चालत होते. परिणामी नव्याने काढण्यात येणारी शिधापत्रिका डाऊनलोड होत नव्हती. नागरिकांना शिधापत्रिका कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ येत होती. त्याबाबत नागरिकांमध्ये तक्रारींचा सूर होता. तसेच शिधापत्रिकांचे ऑनलाईन कामकाज गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे विविध शासकीय कामांसाठी तसेच कागदपत्रे म्हणून लागणाऱ्या शिधापत्रिका नागरिकांना मिळण्यास उशीर होत आहे. पर्यायाने, विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यातदेखील अडचणी येत आहेत, अशी तक्रारी स्वस्त धान्य दुकानदारही करत होते.
मात्र संबंधित विभागाच्या वरिष्ठ पातळीवरूनच संकेतस्थळ अपडेट करण्याचे काम सुरू होते. काही दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. आता संकेतस्थळ व्यवस्थित चालू असून नवीन शिधापत्रिकांचेही वाटप केले जात आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या आठवड्यापासून आता संकेतस्थळ सुरळीत सुरू झाल्याने प्रलंबित कामे मार्गे लागतील.
संकेतस्थळाबाबत काही दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. सध्या येणाऱ्या अडचणी थांबल्या आहेत. नवीन शिधापत्रिका डाऊनलोड करून देण्याचे काम कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
- गजानन देशमुख, रिमंडळ अधिकारी, पिंपरी-चिंचवड