पिंपरी-चिंचवड: अखेर पूर्णानगर येथील मैदानाची दुरुस्ती; 'सीविक मिरर'च्या वृत्ताची पालिकेकडून तत्काळ दखल
पूर्णानगर येथील पंडित दीनदयाळ मैदानावर आंतर शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या मैदानावर पावसाचे पाणी साचून चिखल तयार झाला होता. खेळाडू आणि पालकांनी निराशा व्यक्त केली होती. २९ सप्टेंबर रोजी 'सीविक मिरर'ने या विषयाला वाचा फोडताना 'खेळाडूंनी चिखलात खेळा खो खो' असे वृत्त दिले होते. या वृत्ताची दखल घेत पालिकेच्या क्रीडा विभागाने दुरुस्ती करत मैदान खेळण्यासाठी योग्य केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी दूर होऊन क्रीडा स्पर्धा व्यवस्थित पार पडतील, अशी माहिती क्रीडा विभागाने दिली.
पुणे जिल्हा क्रीडा परिषद, पुणे जिल्हा अधिकारी कार्यालय आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आंतरशालेय क्रीडा स्पर्धा २०२३-२४ आयोजित करण्यात आल्या आहेत. या अंतर्गत चिंचवड, पूर्णानगर येथील पंडित दीनदयाळ मैदानात सकाळपासून आंतर शालेय खो खो च्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे या मैदानावर चिखल साचला होता. चिखलातच खो-खो स्पर्धा सुरू करण्यात आल्या. खेळताना खेळाडूंचे पाय घसरत होते. या स्पर्धांचे वेळ किंवा ठिकाण बदलून शहरात उपलब्ध असणाऱ्या बंदिस्त क्रीडा संकुलात आयोजन करणे अपेक्षित होते. मात्र ते झाले नाही. या चुकांबाबत काही पालक व क्रीडा शिक्षकांनी मैदानावरील त्रुटी आयोजकांच्या निदर्शनास आणून दिल्या. 'सीविक मिरर', खेळाडूंच्या व पालकांच्या तक्रारींची दखल घेऊन क्रीडा विभागाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली. मैदानात चिखल झालेल्या भागात माती टाकण्यात आली. इतर उपाययोजना करत मैदान सुकविण्यात आले. सध्या मैदान व्यवस्थित असून स्पर्धाही सुरळीत चालू असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
पावसामुळे एक दिवस अडचण आली होती. त्यानंतर त्याची लगेच दखल घेण्यात आली. सध्या मैदान व्यवस्थित केले आहे. स्पर्धाही सुरळीत चालू आहेत.
- अनिता केदारी, क्रीडा अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका