पिंपरी-चिंचवड : शहरात दीड हजार घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या

पावसाळा सुरू झाल्याने आरोग्य विभागाकडून शहरातील प्रत्येक घरे, विविध आस्थापना, बांधकाम साईट, भंगार दुकाने यासह विविध ठिकाणी डासांच्या अळ्यांची तपासणी करण्यात येत आहे. या कंटेनर सर्व्हे एकूण १ लाख १ हजार १९५ घरे, २८० बांधकाम साईटची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४५० घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. तसेच ५८५ विविध आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एकूण ७२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Thu, 27 Jun 2024
  • 12:36 pm
pimpri chinchwad news

शहरात दीड हजार घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या

प्रतिबंधात्मक कारवाईत ७२ हजार रुपयांचा दंड केला वसूल, ५८५ आस्थापनांना बजावली नोटीस

विकास शिंदे :
पावसाळा सुरू झाल्याने आरोग्य विभागाकडून शहरातील प्रत्येक घरे, विविध आस्थापना, बांधकाम साईट, भंगार दुकाने यासह विविध ठिकाणी डासांच्या अळ्यांची तपासणी करण्यात येत आहे. या कंटेनर सर्व्हे एकूण १ लाख १ हजार १९५ घरे, २८० बांधकाम साईटची तपासणी करण्यात आली. यामध्ये १४५० घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. तसेच ५८५ विविध आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एकूण ७२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कीटकनाशक आणि औष्णिक धुरीकरण विभागाच्या वतीने १ ते २२ जून २०२४ या कालावधीत केलेल्या तपासणीत शहरातील विविध ठिकाणी डासांच्या अळ्या आढळून आल्याने १४ जणांवर 'डास उत्पत्ती स्थानांची निर्मिती' या शीर्षकाखाली दंड प्रमाणांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या आरोग्य तपासणी पथकाच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून एकूण १ लाख १ हजार १९५ घरे तसेच २८० बांधकामांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण १ हजार ४५० घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळल्या. तसेच या पाहणीदरम्यान २८२ टायर, पंक्चर भंगारांची दुकाने, ४ लाख ७४ हजार ४० कंटेनर्सचीही तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ हजार ४५४ कंटेनर्समध्ये डासांच्या अळ्या आढळल्या होत्या. या ठिकाणी योग्य ती डास प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे.

पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या सारखे रोग पसरू नयेत म्हणून महापालिकेकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील डेंग्यू, मलेरिया प्रतिबंधात्मक मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणी पथकातील कर्मचारी तपासणीसाठी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच महापालिकेच्या रुग्णालयात तसेच दवाखान्यांमध्ये डेंग्यूच्या तपासणीकरिता आवश्यक असलेले रॅपिड किट उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. कीटकजन्य रोग नियंत्रणासाठी स्वच्छ पाण्यात गप्पी मासे सोडणे, शहरातील विविध ठिकाणी पाहणी करून घरांच्या कंटेनरचे सर्वेक्षण, व्यवसायाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी तपासणी पथकांची नेमणूक करून डासांच्या अळ्या आढळून आलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे.

घरातील साधनांची तपासणी आवश्यक

घराच्या आत आणि बाहेर स्वच्छ पाण्याने भरलेल्या कंटेनरमध्ये डासांची उत्पत्ती होत असते, शिवाय घरातील फ्लॉवर-पॉट, मनी प्लांट्स आणि फ्रीज ड्रिप पॅनमधील पाण्यात देखील अशी उत्पत्ती आढळून येते यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अशा साधनांची नागरिकांनी नियमितपणे तपासणी करणे देखील आवश्यक आहे.

औद्योगिक, बांधकाम आस्थापना, कार्यालये, गृहसंस्था, घरे तसेच व्यावसायिक दुकानांसह सर्व आस्थापनांनी आपल्या ठिकाणी असलेली डासोत्पत्ती स्थळे तत्काळ नष्ट करावीत अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. तसेच शहरात सुरू असलेल्या विविध बांधकामांच्या ठिकाणी महापालिकेने विशेष लक्ष केंद्रित केले असून त्या भागांची तपासणी करून संबंधितांना नोटीस बजावण्यात येत आहे. शिवाय अशी ठिकाणे आढळून आलेल्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story