संग्रहित छायाचित्र
विकास शिंदे :
पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपूल धोकादायक बनला होता. त्यामुळे त्या उड्डाणपुलावरून अवजड वाहतुकीसह अन्य वाहतूक बंद करा म्हणून रेल्वे प्रशासनाकडून महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागास पत्र आले आहे. त्यामुळे पिंपरी डेअरी फार्म येथील उड्डाणपुलाचे काम ९ महिन्यांत पूर्ण करावे लागणार आहे. २५ मार्च २०२५ रोजी निर्धारित मुदतीत काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
पिंपरी गावातून पुणे-मुंबई महामार्गावर प्रवेश करण्यासाठी पिंपरी डेअरी फार्म रस्त्याचा उपयोग केला जातो. पिंपरी डेअरी फार्म येथे लोहमार्ग असल्याने रेल्वेचा सिग्नल दिल्यानंतर वाहनांना दहा ते पंधरा मिनिटे वाट पाहावी लागते. नोकरी, व्यवसाय तसेच इतर महत्त्वाच्या कामासाठी जाणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेने डेअरी फार्म येथील लोहमार्गावर उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात केली आहे. या कामाला वर्षभराची मुदत देण्यात आली आहे. २५ मार्च २०२५ रोजी ही मुदत संपुष्टात येते. सध्या पुलाचे खांब बांधण्यात आले आहेत. रेल्वे पटरीवरील काम हाती घेण्यात आले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नऊ महिन्यांचा अवधी अपेक्षित आहे. त्यानंतर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.
या ठिकाणी पूल बांधण्याची पिंपरी-चिंचवडकरांची गेल्या कित्येक वर्षांपासूनची मागणी होती. उड्डाण पूल नसल्यामुळे लोहमार्ग फाटकासमोर दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत होती. परिणामी अपघात देखील घडले आहेत. याचा विचार करून महापालिकेने या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात केली. त्यासाठी हा रस्ता गेल्या चार महिन्यांपासून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी, पिंपरी गावातील नागरिकांना पिंपरी कॅम्पमधून साई चौकातील बोगद्यातून किंवा लिंकरोडमार्गे उड्डाणपुलावरून मोरवाडी येथे बाहेर पडावे लागते. त्यामुळे लवकरात लवकर पुलाचे काम मार्गी लावून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रेल्वे खात्याची परवानगी हवी
रेल्वे उड्डाणपुलाची लांबी १ हजार २९० मीटर इतकी आहे. तर, रुंदी १७.२० मीटर इतकी आहे. या कामासाठी ६५.२८ कोटी रुपयांचा खर्च केला जात आहे. हे काम ३१ मार्च २०२३ रोजी सुरू झाले. आतापर्यंत ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. ३१ मार्च २०२५ पर्यंत कामासाठी मुदत दिलेली आहे, अशी माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आली आहे.
रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वे खात्याची परवानगी अपेक्षित आहे. या ठिकाणी करण्यात येणाऱ्या कामांसाठी लष्कराकडून परवानगी मिळालेल्या आहेत. रेल्वे खात्याची परवानगी मिळाताच पुलाचे काम लवकर मार्गी लावण्यात येईल.
- प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता