नागरिकांचे आंदोलन; महापालिकेची चमकोगिरी
नदीसुधार प्रकल्प राबवण्यासाठी सुरु असलेली वृक्षतोड, नदीपात्रातील काँक्रीटीकरण, त्यातून होणारा पर्यावरणाचा ऱ्हास याविरोधात पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी रविवारी (दि. २३) पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात साखळी आंदोलन केले. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, महिला, मुली, लहान मुले उत्स्फुर्तपणे सहभागी झाली होती. या आंदोलनातील छायाचित्रे महापालिकेने आयोजित केलेल्या अभियानाला मिळालेला प्रतिसाद दर्शवण्यासाठी स्वतःच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याचे उघड झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी स्वच्छ सर्वेक्षण २०२४ व माझी वसूंधरा ड क्षेत्रीय कार्यालय लिनियर गार्डनमध्ये जागतिक हवामान दिनानिमित्त जनजागृती मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र महापालिकेविरोधातील आंदोलनाची छायचित्रे वापरत पालिकेने स्वतःचाच उदो-उदो करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले आहे. पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातील लिनियन गार्डनमध्ये नदी प्रदूषण, पिण्याचे पाणी केमिकलयुक्त, वृक्षतोड, हवा प्रदूषण, यासह विविध विषयांवर नागरिकांचे साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे फोटो घेवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फेसबूक पेजवर 'स्वच्छतेला साथ देवू, निसर्गाची निगा राखू, हवामान बदलांना रोखू', असे आवाहन करण्यात आले.
मुळात नागरिकांच्या साखळी आंदोलनातून महापालिकेच्या विविध विकासकामांच्या नावाखाली सुरु असलेल्या पर्यावरणाच्या ऱ्हासाचा निषेध व्यक्त करत असताना तेच आंदोलनाचे फोटो वापरुन आपल्या अभियानाला कसा उत्तम प्रतिसाद मिळाला, लोकसहभाग वाढवण्यात आपल्याला कसे यश मिळते, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न महापालिकेने केला आहे. महापालिकेचे जनजागृती अभियान आणि साखळी आंदोलनाचा काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट असतानाही असा प्रकार केल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
पिंपरी-चिंचवडकरांनो जागे व्हा, बघताय काय, सामील व्हा
पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे ३० लाख नागरिकांनो तुम्ही वेळीच सावध व्हा. आपल्या आजू-बाजूला सुरु असलेला नदी, नाल्यातील प्रदूषण थांबवा, वृक्षतोड थांबवा, पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करा, याकरिता पिंपरी-चिंचवडकरांनो जागे व्हा, बघताय काय, सामील व्हा, अशा आशयाचे फलक घेवून रविवारी अनेक नागरिकांनी पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात साखळी आंदोलन केले. पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकात सकाळी ९ वाजता नागरिकांनी साखळी आंदोलनास सुरुवात केली. विविध आशयाचे फलक घेवून आंदोलन करत होते. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील प्रत्येक नागरिकांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे, नद्यांचे होणारे प्रदूषण थांबावे, नदीसुधार प्रकल्पानिमित्त काँक्रीटच्या भिंती उभारून भूजल आटवू नका, नदीसुधाराच्या नावाखाली वृक्षतोड करणारा विनाश थांबवा, नदीतील घाण पाणी, केमिकल्स टाकणे थांबवून नागरिकांना दुर्धर आजारातून वाचवा, नदीत केमिकलयुक्त पाणी सोडणे थांबवून नागरिकांचे आरोग्य काळजी घ्या, असे विविध फलक हातात घेवून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात होती. पिंपळे सौदागर येथील कोकणे चौकातून ये-जा करणारे वाहनचालक, दुचाकीचालक थांबून साखळी आंदोलनातील नागरिकांच्या हातातील फलक वाचत होते. यावेळी आंदोलनकर्ते त्यांना 'बघता काय, सामील व्हा. नागरिकांनो जागे व्हा', असे आवाहन करत होते.
पिंपरी-चिंचवड महापालिका साबरमती नदीच्या धर्तीवर शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांसाठी नदीसुधार योजना राबवत आहे. त्याद्वारे या दूषित नद्या स्वच्छ व सुंदर करण्यात येणार आहेत. मात्र, नदीसुधार प्रकल्पाच्या नावाखाली जो विनाश सुरु आहे. त्याला नागरिकांचा तीव्र विरोध होवू लागला आहे. नदीकाठची झाडे तोडू नका, नदीकाठ ओसाड करु नका, नदीकाठी असलेले जंगल हे नदीसुधारसाठी तोडून विनाश करु नका. पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांना नद्याच्या प्रदूषणामुळे केमिकलयुक्त पाणी प्यावे लागत आहे. याकरिता केवळ नद्यांमध्ये मिसळणारे सांडपाणी व रासायनिक पाणी थांबवून त्यावर प्रक्रिया करुन ते पाणी नदीत सोडण्यात यावे. नदीची काळजी घेतली तरच नागरिकांची आरोग्य चांगले राहणार आहे. पाणी वाचवणे ही काळाजी गरज असून त्यामुळे नदीपात्रातील काँक्रीटीकरण थांबवणे आवश्यक आहे. याकरिता शहरातील नागरिक रस्त्यावर उतरुन साखळी आंदोलन करु लागले आहेत.
दरम्यान, महानगरपालिकेच्या नदीसुधार प्रकल्पातून शहरातील नद्यांचे होणारा विनाश थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकातून होत आहे. मुळा नदीचे सुधार प्रकल्पाचे काम सुरु आहे. तेथील परिस्थिती बघता नदीचे सुशोभिकरण, कॉंक्रीटीकरण, वृक्षतोड, नद्याचे पात्र अरुंद करण्याचे प्रकार होत आहेत. तसेच पवना आणि इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करा, याकरिता नदीत मिसळणारे सांडपाणी, रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करावी. नदीकाठचे जंगल वाचवा. तेथील हेरिटेजमध्ये मोडणारी झाडे वाचवा, आम्हाला सुशोभिकरण नको, नदीची स्वच्छता हवी. अशा घोषणा देत नागरिकांनी साखळी आंदोलन केले. या आंदोलनात विविध ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.
पवना, मुळा आणि इंद्रायणीतील प्रदूषण कमी करुन नदीची स्वच्छता करण्यात यावी. नदीमधील वृक्षतोड थांबवावी, नदीत सोडले जाणारे सांडपाणी व रासायनिक पाण्यावर तात्काळ प्रक्रिया करा. नैसर्गिक पाण्याचे झरे सुरु ठेवा. नदीपात्रात सिमेंट काँक्रीट बंद करा.
- गणेश बोरा, सामाजिक कार्यकर्ते
नदीसुधार प्रकल्पात सिमेंटच्या भिंती बांधून विहीर, बोअरवेलसह जमिनीतील भूजल आटवू नका, नदीकाठावर सर्वत्र जंगल आहे. ते जंगल तोडून त्याचा विनाश करु नका. दगड, माती आणि मुरुम नदीत टाकून जैवविविधता संपुष्टात आणू नका.
- मयूर जैस्वाल, सामाजिक कार्यकर्ते
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या फेसबुक पेजवर पिंपळे सौदागर येथील साखळी आंदोलनाबाबत कुणी पोस्ट अपलोड केली, त्याची चौकशी करण्यात येईल. जे दोषी असतील त्यांच्यावर महापालिकेच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका