विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मातंग समाजाचे आंदोलनकर्ते धडकले
पंकज खोले :
यमुनानगर, निगडीतील नियोजित डॉ. आण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन उभारण्याची कार्यवाही करावी, आण्णा भाऊ साठे यांच्या निगडीतील पुतळ्यालगतचा मेट्रो टर्मिनलचा डीपीआर बदला आदी मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर मातंग समाज कृती समितीने पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली.
या वेळी अप्पर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले. समितीचे संस्थापक संदीपान झोंबाडे यांच्या नेतृत्त्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डीपी कांबळे, आण्णासाहेब कसबे, चंद्रकांत लोंढे, रामदास कांबळे, मयूर जाधव, अनिल गायकवाड आदींसह समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निगडी येथे लोकशाहीर डॉ. आण्णा भाऊ साठे यांचा पुतळा आहे. मेट्रोकडून शेवटचे मेट्रो टर्मिनल येथे उभारणार आहे. त्यासाठी पुतळ्याची सीमाभिंत, उद्यान परिसरात मेट्रोचे खांब, पुतळ्यालगतच्या भिंती बाधित होणार आहेत. जीना व पुतळ्यामागे स्टेशन उभारणार आहे.
त्यामुळे मेट्रो टर्मिनलचा डीपीआर त्वरित बदलावा. यमुनानगर, निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णा भाऊ सांस्कृतिक भवन मंजूर झाले आहे. त्यासाठी असणाऱ्या चार एकर १७ गुंठे जागेतील केलेले अतिक्रमण तत्काळ हटवावे.अतिक्रमणास प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांचा व लोकप्रतिनिधींवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा.
मूळ प्रस्तावानुसार निश्चित केलेली योजना राबविण्यात यावी. २०१४ साली साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण केंद्र या नावे (आर्टी) करीता महापालिकेने हाफकिन महामंडळाची पाच एकर जागेचा ठराव मंजूर केला आहे. तसा प्रस्ताव राज्य शासन व केंद्र शासनाकडे तत्काळ मंजूर करण्यास पाठवावा. आद्य क्रांतिगृह लहुजी वस्ताद साळवे यांचे नाव महापुरुषांच्या केंद्र व शासन यादीमध्ये समाविष्ट करावे. १३ टक्के अनुसूचित जातीच्या कोट्यात अ,ब,क,ड करून मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करून जागा द्यावी. साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा. आंदोलन करणाऱ्या राज्यातील मातंग कार्यकर्त्यांवरील दाखल गुन्हे माघारी घ्यावेत, आदी मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहेत.
संबंधित विषयांवरील निवेदन प्राप्त झाले आहे. ते स्वीकारण्यात आले असून, संबंधित विषय महापालिकेच्या अखत्यारीतील आहेत. त्यानुसार त्या विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.
- जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार