वर्षभरानंतर प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची नियुक्ती, नवे अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत
पिंपरी- चिंचवड आरटीओचा दर्जा वाढवून तो प्रादेशिक परिवहन कार्यालय करण्यात आला आहे. मात्र वर्षाने या कार्यालयास खऱ्या अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त झाले. उपप्रादेशिक अधिकाऱ्यांकडून सुरू असलेला कारभार शुक्रवारी परिवहन अधिकाऱ्यांनी पहिल्यांदाच स्वीकारला. मात्र, अवघा तासभर थांबून हे अधिकारी पुन्हा मुंबईला निघून गेले. नव्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलेले नागरिक आणि अधिकारी ताटकळत थांबले होते. पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून संदेश चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली. तत्कालीन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांची मुंबईत बदली झाली. त्यानुसार आज सकाळी साडेदहा वाजता चव्हाण यांनी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी आरटीओ साहाय्यक परिवहन अधिकारी, मोटर निरीक्षक आणि कर्मचारी केबिन बाहेर थांबले होते. अवघ्या तासात उपस्थित निवडक अधिकाऱ्यांची भेट घेऊन ते पुन्हा माघारी गेले. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी आलेले इतर कर्मचारी आणि नागरिकांनाही ताटकळत थांबावे लागले. दरम्यान, न्यू पिंपरी चिंचवड ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नवे अधिकारी संदेश चव्हाण यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
जुलै २०२३ मध्ये शासन आदेश येऊनही पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नावाने प्रत्यक्ष कारभार सुरू झालेला नव्हता. विशेष म्हणजे केवळ एका उपप्रादेशिक अधिकाऱ्यांवर वर्षभर येथील कार्यभार रेटला गेला. त्यामुळे कार्यालयाचा ताण कमी होईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात विविध कारणांनी ही प्रक्रिया रखडली होती. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, सोलापूर आणि अकलूज या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयांचा समावेश होतो. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा दर्जा वाढविल्यामुळे पुणे प्रादेशिक कार्यालयाची पुणे, पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर या तीन भागात विभागणी झाली आहे.पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय असेल. सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत अकलूज हे उप प्रादेशिक कार्यालय असेल. पिंपरी-चिंचवड स्वतंत्र प्रादेशिक परिवहन कार्यालय असणार आहे. जुन्नर, आंबेगाव, पिंपरी-चिंचवड, मावळ असा मोठा परिसर पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारित आता असणार आहे. दर्जा वाढल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्यादेखील वाढणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी वाढल्यामुळे आताच्या मनुष्यबळावर येणारा ताण कमी होणार आहे.
नियुक्तीची प्रतीक्षा
पिंपरी- चिंचवड कार्यासाठी नव्याने दोन उपप्रादेशिक अधिकारी मिळणार आहे. सध्या नियुक्त असलेल्या दोन साहाय्यक परिवहन अधिकाऱ्यांच्या संख्येतही वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे मोटार वाहन निरीक्षक हेही नव्याने रुजू होतील. मात्र केवळ एकाच उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याची नेमणूक केली. संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप त्याचा चार्ज घेतला नाही.
ही आहेत आव्हाने
पिंपरी चिंचवड कार्यालयाचा वर्षभरापूर्वी दर्जा वाढला असल्याने स्वतंत्र अधिकार प्राप्त झाले आहेत. मात्र, नागरिकांसाठी पार्किंग, तपासणी ट्रॅक, अधिकाऱ्यांसाठी जागा, बंद पडणारी सारथी सिस्टीम, वाहतूक शिस्तीसाठी प्रयत्न, प्रलंबित वाहन परवाने आणि फिटनेसची संख्या कमी करणे, थकित दंड वसूल करणे, अर्जदार आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारी अशी आव्हाने नव्या अधिकाऱ्यांपुढे राहणार आहेत.
नवीन पदे
प्रादेशिक परिवहन अधिकारी – १
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी – २
साहाय्यक परिवहन अधिकारी – ४
मोटर वाहन निरीक्षक – ३०
साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक – ४०
लिपिक – १२