पिंपरी-चिंचवड: रुफटॉप हॉटेल, पब, रेस्टॉरंटवर पुन्हा कारवाई

पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रुफटॉप हॉटेल्स, पब, रेस्टॉरंटमधील अनधिकृत बांधकामे, फायर ऑडिट या अनुषंगाने पुन्हा तपासणी करून अनधिकृत असलेल्या हाॅटेलवर कारवाई करण्यात येणार आहे.

संग्रहित छायाचित्र

अनधिकृत बांधकामे, फायर ऑडिटची तपासणी, ४३ पैकी ३१ रुफटाॅप हाॅटेलवर कारवाई

विकास शिंदे

पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील रुफटॉप हॉटेल्स, पब, रेस्टॉरंटमधील अनधिकृत बांधकामे, फायर ऑडिट या अनुषंगाने पुन्हा तपासणी करून अनधिकृत असलेल्या हाॅटेलवर कारवाई करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील ४३ पैकी ३१ रुफटाॅप हाॅटेलवर कारवाई झालेली आहे. काही हाॅटेलमालकांनी नियमितीकरणाचे प्रस्ताव दिले आहेत. आणखी १२ रुफटॉप हॉटेल्सवर कारवाई बाकी आहे. तसेच शहरात पुन्हा एकदा रुफटॉप हॉटेल, पब, रेस्टॉरंटचे सर्वेक्षण करून जे अनधिकृत असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाइन रोड, भोसरी या भागांसह महापालिका हद्दीलगत असलेल्या परिसरात मोठ्या संख्येने रुफटॉप हॉटेल्स तयार झाली आहेत.

 इमारतींच्या टेरेसवर हॉटेल्स चालवले जातात. या हॉटेल्समध्ये ड्रिंक्स, जेवण अशा सर्व गोष्टी मिळतात. हॉटेल्समध्ये मोठ-मोठे किचन आहेत. मात्र, हे सर्व करताना एकाही हॉटेलमालकाने रुफटॉप हॉटेल्ससाठी परवानगी घेतली नव्हती. कोणाकडेही बांधकाम परवाना नाही, अग्निशमन विभागाचा ‘ना हरकत’ दाखला नाही. महापालिकेच्या अग्निशमन विभागाने काही महिन्यांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात शहरात ४८ रुफटॉप हॉटेल्स असल्याचे निदर्शनात आले होते. तर बांधकाम विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात ४३ रुफटाॅप हाॅटेल आढळून आली होती.

त्यानुसार अग्निशमन विभागाने या हॉटेलमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्याने त्यांना नोटीस बजावली. त्यानंतर काही हॉटेल बंद करण्यात आले. मात्र, काहींनी नोटिशीला उत्तर दिले नाही. त्यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा सर्वेक्षण केले. त्यात २१ अनधिकृत रुफटॉप हॉटेल्स आढळून आली होती. बांधकाम विभागाकडून रुफटाॅप हाॅटेलवर केलेल्या कारवाईत ३१ हाॅटेलवर अनधिकृत बांधकामे निष्कासित केली होती, तर उर्वरित १२ अद्याप कारवाई करणे नियमितीकरणाचे ६ प्रस्ताव, न्यायप्रविष्ट २, बॅक सील १ आणि बंद २, मनपा करारनामा १ अशी एकूण ४३ रुफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, शहरातील सर्व रुफटॉप हॉटेलच्या अनधिकृत असलेल्या बांधकामावर कारवाई केलेली आहे. ही कारवाई महापालिकेने मागील सहा महिन्यांत केली आहे. त्यानंतरही आता रुफटॉप हॉटेल्सवर सरसकट सर्वेक्षण करून पुन्हा एकदा कारवाई करण्याचे धोरण महापालिकेने हाती घेतले. 

मात्र, हाॅटेल मालक व अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर ते काही नियम व अटी टाकून अधिकृत करण्यात आले होते. त्यामध्ये ४३ रुफटॉप हॉटेल्सना ‘अधिकृत’चे दाखले महापालिकेने दिले होते. मात्र, महापालिकेने घालून दिलेल्या अटी व शर्ती न पाळताच रुफटॉप हॉटेल्स बिनबोभाट सुरू आहेत.

शहरात एकही अनधिकृत रुफटॉप हॉटेल नाही. मात्र, काहींनी टेरेसवर ग्राहकांना बसण्याची परवानगी घेतली आहे. ही परवानगी घेतानाही त्यांची बैठक व्यवस्था व बांधकाम असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक हॉटेलचालकांनी टेरेसवर जास्त ग्राहकांना बसता यावे, यासाठी परवानगी व्यतिरिक्त बैठक व्यवस्था व तेथील सुविधा वाढवल्या आहेत. अशी हॉटेल्स अधिकृत असली, तरी नियमांची अंमलबजावणी न केल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. फायर ऑडिट व अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- शेखर सिंह, आयुक्त,  महापालिका, पिंपरी-चिंचवड

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story