शहरातील ९७ टक्के नाल्यांची साफसफाई पूर्ण!
विकास शिंदे :
मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. पावसाळ्यात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ नये, पाण्याचा निचरा तात्काळ व्हावा, याकरिता महापालिका आयुक्तांनी ३१ मेपर्यंत नालेसफाईचे आदेश दिले होते. त्यानंतर १ जून रोजी आयुक्तांनी नाले सफाईचा आढावा घेऊन स्थळ पाहणीही केली, त्यानंतर १३ जूनअखेर शहरात १४३ नाल्यांची ९७ टक्के साफसफाई पुर्ण झाली आहे, असा दावा आरोग्य कार्यकारी अधिकारी यशवंत डांगे यांनी केला.
पिंपरी-चिंचवड शहरात छोटे-मोठे १४३ नाल्यांची पावसाळी पूर्व साफसफाई करण्यास आरोग्य विभागाने सुरुवात केली. शहरातील पावसाळी पुर्व नाल्यांची साफसफाई ३१ मे अखेर पुर्ण करण्याचे आदेश आयुक्तांनी आरोग्य विभागास दिले होते. त्यानुसार आरोग्य विभागाने आठ क्षेत्रीय कार्यालयामधून नाले साफसफाई करण्यात येत आहे. शहरामध्ये २ ते ११ मीटर रुंदीचे १०० किलो मीटर अंतराचे १४३ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. सर्वच नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लास्टिक, भंगार व टाकाऊ साहित्य टाकले जाते. अनेक नागरिक घरगुती कचरा या नाल्यांमध्ये टाकतात. या नाल्यात गाळ साचल्याने नाले अरुंद व उथळ होतात.
शहरातून पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्या वाहतात. त्यांना मिळणारे १४३ नाले शहरात आहेत. बहुतांश नाले काही भागात बुजवले असून, त्यावर बांधकामे झाली आहेत. काहींची काँक्रीटने बांधणी करून, ‘नाला पार्क’ केले आहेत. मात्र, नाल्यांमध्ये उगवलेले गवत, झाडे, झुडपे, नागरिकांकडून टाकला जाणारा राडारोडा, कचरा यामुळे पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह रोखला जाऊन पूरस्थिती निर्माण होते. नाल्यांमुळे पुरपरिस्थिती टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी दरवर्षी नालेसफाई केली जाते. यावर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नालेसफाई गती देऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम वेळेत पूर्ण करण्याचा आदेश आयुक्त सिंह यांनी गेल्या महिन्यात सर्व अधिकाऱ्यांना दिला होता. मात्र, आरोग्य विभागाकडून आठ क्षेत्रीय कार्यालयातंर्गत १४३ नाल्यांची तब्बल ९७ टक्के साफसफाई केल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाले सफाईचे काम एप्रिल २०२४ मध्ये सुरु केले. नाल्यांची सफाईसाठी स्थापत्य विभागाने जेसीबी, पोकलेन आणि स्पायडर मशीन आदी यंत्रणा उपलब्ध करुन दिल्या. त्यानूसार क्षेत्रीय अधिका-यांकडून नालेसफाईचे काम सुरु असल्याचे अधिका-यांकडून सांगण्यात येत आहे.
महामार्गावर नाला, सी.डी.वर्क सफाई सुरु
पुणे-मुंबई महामार्गावरील नाला, सी.डी.वकर्स कामाची सफाई तसेच क्राॅस पाईप केलेल्या ठिकाणी अद्याप कामे सुरु आहेत. यामध्ये सँडविक कंपनी, फुगेवाडी, नाशिक फाटा, हॉटेल कलासागर, खराळवाडी, मोरवाडी, बाॅम्बे सिलेक्शन, चिंचवड स्टेशन, हायवे टाॅवर, बजाज कंपनी समोर, निगडी टिळक चौक, श्रीकृष्ण मंदिर निगडी या ठिकाणी अद्याप कामे सुरु आहेत.
शहरातील नालेसफाई ९७ टक्के झाली आहे. सर्वच नाले स्वच्छ करण्यात येत आहेत. काही ठिकाणी अद्याप यंत्राच्या सहाय्याने नालेसफाई सुरू आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालय निहाय पथके नियुक्त केलेली आहेत. त्यांच्या माध्यमातून उर्वरित कामे देखील लवकरच पुर्ण केली जातील.
- यशवंत डांगे, आरोग्य कार्यकारी अधिकारी, महापालिका, पिंपरी-चिंचवड