एका दिंडीतील केवळ ९० वारकऱ्यांनाच प्रवेश

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादिनी देऊळवाड्यात गर्दी होऊ नये, यासाठी दिंड्यांमधील वारकऱ्यांना मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे. ‘श्रीं’च्या रथापुढील २०, मागील २७ आणि ९ उप दिंड्या अशा एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. वारकऱ्यांना मंदिर प्रवेश पास प्रस्थानाच्या दोन दिवस आधी चोपदार आणि संस्थानकडून देण्यात येणार आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Mon, 10 Jun 2024
  • 01:19 pm

संग्रहित छायाचित्र

प्रस्थान सोहळा नियोजन बैठकीत निर्णय, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानदिनी मंदिरातील गर्दी नियंत्रित करणार

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यादिनी देऊळवाड्यात गर्दी होऊ नये, यासाठी दिंड्यांमधील वारकऱ्यांना मर्यादित प्रवेश दिला जाणार आहे. ‘श्रीं’च्या रथापुढील २०, मागील २७ आणि ९ उप दिंड्या अशा एकूण ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. वारकऱ्यांना मंदिर प्रवेश पास प्रस्थानाच्या दोन दिवस आधी चोपदार आणि संस्थानकडून देण्यात येणार आहेत.

माउलींच्या पालखीचे २९ जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. प्रस्थान सोहळ्याच्या नियोजनाबाबत देवस्थानच्या भक्तनिवासात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, पालखी सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, डॉ. भावार्थ देखणे, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे व्यवस्थापक माउली वीर, पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्रांताधिकारी जोगेंद्र कट्यारे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र गौड, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार, राणू महाराज वासकर, भाऊसाहेब गोसावी, भाऊ महाराज फुरसुंगीकर, मारुती कोकाटे यांच्यासह दिंडी चालक-मालक या वेळी उपस्थित होते.

मंदिराच्या क्षेत्रफळाचा विचार करून आवश्यक गर्दी कमी करण्याबाबत चर्चा झाली. वारकरी संप्रदायातील मान्यवरांनी प्रस्थानदिनी १२५, १०० किंवा ९५ वारकरी संख्या निश्चित करण्याची मागणी केली. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी मानाच्या ४७ दिंड्या आणि नऊ उपदिंड्या अशा ५६ दिंड्यांतील प्रत्येकी ९० वारकऱ्यांना प्रवेश देण्यास मान्यता देण्यात आली. प्रशासन आणि मानाच्या दिंडीकऱ्यांकडून यास एकमुखाने मान्यता देण्यात आली.

दरम्यान गेल्या वर्षी मंदिरात प्रवेशादरम्यान महाद्वारात, वारकरी शिक्षण संस्थेच्या बोळासमोरून महाद्वाराकडे येताना वारकऱ्यांच्या गर्दीने चेंगराचेंगरी झाली होती. वारकरी विद्यार्थी आणि पोलीस यांमध्ये हुज्जत झाली होती. त्या वेळी लाठीमारासारखी घटना घडली. असा अनुचित प्रकार यापुढे घडू नये यासाठी दक्षता घेण्यासह उपाययोजनासंदर्भात चर्चा झाली.

देऊळवाड्यात जागा कमी आहे. त्यामुळे मानाच्या प्रत्येक दिंडीतील ९० वारकऱ्यांना मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी, माध्यम प्रतिनिधींच्या संख्येवर नियंत्रण घालण्यात येणार आहे.
- माउली वीर (व्यवस्थापक, आळंदी देवस्थान)

पालखी सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने वारीचे मार्गक्रमण, परंपरा जाणून घेण्याची भूमिका पोलिसांची असते. चेंगराचेंगरी टाळण्यासाठी वारकऱ्यांची संख्या मर्यादित असावी.
- डॉ. शिवाजी पवार, पोलीस उपायुक्त

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story