संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी ब्लॅक फिल्मिंग प्रकरणी मोठी कारवाई केली आहे. १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत दोन हजारांहून अधिक वाहनांच्या काळ्या काचा उतरवण्यात आल्या आहेत. काळ्या काचा उतरवून वाहन चालकांवर आर्थिक दंड आकारण्याची कारवाईही करण्यात आली आहे.
वाहनांच्या काचा काळ्या असणे हे सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये स्टेटस सिम्बॉल ठरत आहे. मात्र वाहनांच्या काचा काळ्या करणे, त्या पारदर्शक नसणे हा अपराध आहे. यामुळे अनेकदा अपघात, गैरकृत्ये होत असल्याचे समोर आले आहे. काळ्या काचा असणाऱ्या वाहनातून अवैध मालाची विक्री देखील होण्याची शक्यता असते. तसेच विघातक कृत्य करणाऱ्यांचा वावर अशा वाहनांमधून होऊ शकतो. त्यामुळे वाहनांच्या काचा पारदर्शक असणे बंधनकारक आहे. १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी २ हजार २७८ वाहनांच्या काळ्या काचा उतरवून कारवाई केली.
कर्णकर्कश सायलेन्सर ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी आहे. दुचाकीचे मूळ सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाचा सायलेन्सर बसविण्याचे प्रमाण शहरात वाढत आहे. याचा नाहक मनस्ताप सर्वसामान्य नागरिकांना होतो. त्यामुळे अशा १ हजार ३२ दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. आरटीओच्या परवानगीशिवाय वाहनात कोणताही बदल केल्यास त्या वाहनचालकाला एक हजार रुपये दंड केला जातो. वातुकीला शिस्त लागण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी काही ठिकाणी नो पार्किंग जाहीर करण्यात आले आहे. अशा ठिकाणी काही नागरिक वाहने पार्क करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि इतर समस्या निर्माण होतात. ४५ दिवसांच्या मोहिमेत पोलिसांनी १३ हजार ६९४ वाहनांवर कारवाई केली आहे.
वाहनांची वाढती संख्या आणि अपुरे रस्ते यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी शहरात दिवसा जड अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील दिवसा जड अवजड वाहने शहरात दिसल्यास त्यावर कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी ४५ दिवसात १२ हजार ३२३ जड अवजड वाहनांवर कारवाई केली आहे.
पोलीस प्रेझेन्स वाढविण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी रूटमार्च नंतर प्रभारी अधिकाऱ्यांना देखील रस्त्यावर थांबण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकाचौकांमध्ये पोलीस दिसले तर गुन्हेगारी, वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्यांना चाप बसेल हा यामागील आयुक्तांचा हेतू आहे.
वाहतूक विभागाच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी रस्त्यावर थांबण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. विरुद्ध दिशेने प्रवास करणे, भरधाव वेगात वाहन चालवणे, काळ्या काचा, बीआरटी मार्गातून प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची मोहीम सुरु आहे. प्रभारी अधिकारी चौकांमध्ये थांबल्याने या मोहिमांना वेग आला आहे.