आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पालखी मुक्कामी असणा-या आकुर्डी गावठाण विठ्ठल मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणावर कारवाई केली आहे. सार्वजनिक रस्ते, मंदिर परीसर व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत टपऱ्या, पत्र्याचे शेड यावर दोन दिवस शनिवारी (दि.१४) सकाळपासून जेसीबी व गॅस कटरच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली.
आषाढी वारी पालखी सोहळ्यात हजारो भाविक पिंपरी-चिंचवड शहरात येत असतात. राज्यभरातून आलेल्या भाविकाची आकुर्डीत संत तुकाराम महाराज पालखीचा पहिला मुक्काम असतो. या भागातून हजारो भाविकांची वारी विठ्ठल मंदिराकडे मार्गस्थ होत असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून ही महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे.
महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या आदेशानुसार श्री विठ्ठल मंदिर परिसरातील संत तुकाराम महाराज पालखी तळावरील अतिक्रमण काढण्यात आले. यापुर्वी देखील अनेक वेळा येथील अतिक्रमण काढण्यात आले होते. विठ्ठल मंदिरापासून जवळच असलेल्या भाजी मंडई मध्ये गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी, होळी, गुडी पाडवा व आकुर्डी गावची यात्रा यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे स्थानिक व्यापारी व हातगाडी, पथारी व्यावसायिकाकडून अतिक्रमण केले होते.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी अखंडपणे श्री विठ्ठल मंदिर आकुर्डी येथे मुक्कामास येत आहे. गेल्या काही वर्षांपासून पालखी तळावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भाविक भक्तांचे आणि दर्शनास येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होवू लागली होती.
तसेच स्थानिक नागरिकांकडून पालखी मुक्काम दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा मुद्दा वेळोवेळी उपस्थित केला जात होता. यासाठी पर्यायी जागेचा शोधही सुरू होता. परंतु, आकुर्डी पालखी मुक्कामाची कित्येक वर्षाची परंपरा अबाधित राहावी यासाठी आयुक्त शेखर सिंह यांनी १५ दिवसापूर्वी पालखी तळाची पाहणी केली. पालखी तळावरील व मार्गावरील अतिक्रमण लवकरात लवकर काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानूसार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने स्थानिक पोलीस बंदोबस्तासह शांततेत व नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई केली. काही व्यावसायिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत कारवाई सुरळीत पार पाडली.
स्थानिक नागरिकांचे समर्थन
अनेक स्थानिकांनी या मोहिमेचे स्वागत केले. “दरवर्षी अतिक्रमणांमुळे पालखी मार्गावर चालणे ही कठीण होते. यंदा महापालिकेने वेळेवर हस्तक्षेप करून योग्य निर्णय घेतला आहे,” अशी प्रतिक्रिया स्थानिक रहिवाशांनी दिली.
सातत्यपूर्ण कारवाईची मागणी
ही कारवाई एकदाच न करता सातत्याने व्हावी आणि सार्वजनिक जागांचा वापर नागरी सुविधांसाठीच व्हावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. आगामी वारीच्या पार्श्वभूमीवर अशा नियोजनबद्ध कारवायांमुळे भाविकांच्या सुरक्षेला आणि वाहतुकीस पूरक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या पालखी तळावर अतिक्रमण केल्यास यापुढे देखील कारवाई करण्यात येईल. ही कारवाई केवळ आकुर्डीपुरती मर्यादित नसून, अन्य अतिक्रमित भागांमध्येही येत्या काही दिवसांत टप्प्याटप्प्याने कारवाई केली जाणार आहे.
-मनोज लोणकर, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, महानगरपालिका.