संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाचे नाव बदलून आता शहरी दळणवळण विभाग (अर्बन मोबिलिटी डिर्पाटमेंट) करण्यात आले. तसेच, या विभागासाठी स्वतंत्र अधिकारी, कर्मचारी देत हा विभाग कार्यन्वित करण्यात आला आहे. विभागाचे प्रमुख म्हणून सहशहर अभियंतापदी बापूसाहेब गायकवाड यांची वर्णी लागली आहे.
महापालिकेत सध्या वाहतूक नियोजन विभाग अस्तित्वात होता. या विभागाकडे केवळ शहरातील बीआरटीएस मार्ग व प्रमुख रस्त्यांची जबाबदारी आहे. हा विभाग स्थापत्य प्रकल्प विभागाअंतर्गत आहे. पूर्वी त्या विभागाचे नाव बीआरटीएस विभाग असे होते. नंतर ते वाहतूक नियोजन करण्यात आले. आता त्यातही बदल करून या विभागाचे नाव शहरी दळणवळण विभाग असे करण्यात आले आहे.
या नवीन विभागासाठी स्वतंत्र आकृतीबंध तयार करण्यात आला असून, स्वतंत्र सहशहर अभियंता असणार आहे. या विभागासाठी १ एप्रिल २०२५ पासून महापालिका अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूदही केली जाणार आहे. कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांची सहशहर अभियंतापदी पदोन्नतीस आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली. त्यांच्यासह कार्यकारी अभियंतापदी सुनील पवार, तर उपअभियंतापदी संतोष कुदळे यांची वर्णी लागली आहे. या विभागाकरिता एका सहशहर अभियंत्यासह दोन कार्यकारी अभियंते, तीन उपअभियंते, आठ कनिष्ठ अभियंते असे एकूण १३ पदे निर्माण करण्यात आली आहेत.