मतसंग्राम 2024 : पिंपरीत यंदा कांटे की टक्कर

पिंपरी हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे गेली १० वर्ष येथे आमदार आहेत. २० वर्षे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि सदस्य त्यानंतर पिंपरी विधानसभेचे प्रथम आमदार अशी बनसोडे यांची ओळख आहे.

Matsangram 2024

मतसंग्राम 2024 : पिंपरीत यंदा कांटे की टक्कर

अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यासमोर ‘मविआ’कडून ॲड. गौतम चाबुकस्वार यांचे कडवे आव्हान

पिंपरी हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अण्णा बनसोडे हे गेली १० वर्ष येथे आमदार आहेत. २० वर्षे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि सदस्य त्यानंतर पिंपरी विधानसभेचे प्रथम आमदार अशी बनसोडे यांची ओळख आहे. मात्र, महायुती नसताना २०१४ मध्ये शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी बनसोडे यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये बनसोडे पुन्हा विजयी झाले. परंतु, आता परत ॲड. चाबुकस्वार हे महाविकास आघाडीकडून प्रबळ दावेदार असून यामुळे बनसोडे आमदारकी कायम राखण्याची वाट खडतर झाली आहे.  (Matsangram 2024)

गेल्या विधानसभेला राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार झाल्याने या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा दावा आहे. असे असले तरी सर्वच पक्षातून इच्छुकांनी शंख फुंकले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीतून उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांत रस्सीखेच सुरू आहे. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर, आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याकडून येथून निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुरू आहे.

२००९ मध्ये पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ तयार झाला. पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे तर दुसऱ्या म्हणजे २०१४ च्या विधानसभेत शिवसेनेचे ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आमदारकी मिळवली. २०१९ च्या विधानसभेत शिवसेनेच्या चाबुकस्वार यांचा पराभव करून राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांनी आमदारकी परत मिळवली. यावेळीही पुन्हा बनसोडे-चाबुकस्वार अशी लढत रंगण्याची चिन्हे असतानाच वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर हेदेखील त्यांचा मुलगा सुजातला विधानसभेत पाठवण्यासंदर्भात विचार करत आहेत.  

पिंपरी विधानसभेतील मतदारांनी मावळ लोकसभा २००९ च्या निवडणुकीत शिवसेना अर्थात युतीचे उमेदवार गजानन बाबर यांना मताधिक्य दिलं. ते खासदारही झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार स्थानिक असतानादेखील मतदारांनी त्यांना नाकारलं. त्यामुळे २००९ च्या पिंपरी विधानसभेत युतीचा उमेदवार आमदार होईल, असं अपेक्षित असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडेंच्या गळ्यात आमदारकीची माळ पडली आणि युतीचे उमेदवार अमर साबळे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यासोबतच महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवक संख्या अधिक वाढली.

महापालिकेतील सत्तेच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने शहरात विकासाचं बीज रोवलं आणि पिंपरी-चिंचवडचा चेहरा-मोहरा बदलला. हा विकास राष्ट्रवादी काँग्रेसला २०१४ लोकसभा निवडणुकीत तारेल, अशी अपेक्षा होती. पिंपरी विधानसभेने पुन्हा एकदा शिवसेना अर्थात युतीचे उमेदवार श्रीरंग बारणेंना मताधिक्य मिळाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने राहुल नार्वेकरना आयात केल्याने मतदारांनी नाकारलं असेल, असा अंदाज बांधण्यात आला. याचा परिणाम २०१४ च्या पिंपरी विधानसभेवर होणारच नाही, अशी खात्री राष्ट्रवादी काँग्रेसने बाळगत होती,

त्यावेळी विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंना तिकीट दिलं. जशी आघाडीत बिघाडी झाली तशीच युतीत फूट झाली अन् सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार रिंगणात उतरवले. त्यामुळे मतदार कुणाच्या बाजूने झुकेल, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आमदार झाल्यापासून मतदारांना गृहीत धरणाऱ्या बनसोडेंचा अपेक्षेप्रमाणे मतदारांनी सपशेल नाकारलं आणि ऐन निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या गौतम चाबुकस्वार यांना मतदारांनी आमदारकी दिली.

भाजपने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षासाठी सोडला. तेव्हा झालेल्या लढतीत शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार ५१ हजार ९६ मते मिळवून विजयी ठरले. राष्ट्रवादीचे बनसोडे ४८ हजार ७६१ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर, तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या चंद्रकांता सोनकांबळे यांना आश्चर्यकारकरित्या ४७ हजार २८८ मते मिळाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे गेली १० वर्षे पिंपरीचे आमदार असताना, आता ही जागा वाटपादरम्यान होणाऱ्या महायुतीच्या बैठकीत पिंपरी जागेवर शिवसेना (शिंदे गट) दावा करणार असल्याचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. २०१४ मध्ये शिवसेना-भाजप युतीचा उमेदवार पिंपरीत विजयी झाला होता.

अण्णा बनसोडे यांना एकूण झालेल्या मतदानापैकी ८६ हजार ९८५ तर, शिवसेनेचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना ६७ हजार १७७ मते पडली होती. मोठी चुरशीची लढत त्यावेळी झाली होती. कारण यावेळच्या विधानसभा निवडणुका या सर्व पक्षांनी स्वबळावर लढल्या होत्या. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे बनसोडे हे १९ हजार ८०८ मतांची आघाडी घेत विजयी झाले होते. त्यांनी शिवसेना-भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. लोकसभा निवडणुकीत शिवसेना खासदार बारणे यांच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा होता. आता ही जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी बारणे करत आहेत.

मतदारसंघात ५० झोपडपट्ट्या

पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागणारा आहे, तुलनेने सर्वात लहान आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा १२ किलोमीटरमध्ये दुतर्फा पसरलेला असा हा पिंपरी विधानसभा मतदारसंघ. महापालिका इमारत, नाशिक फाट्यावरील दुमजली पूल, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड-सेप्रेटर, भक्ती-शक्ती समूहशिल्प असा बराच विकसित भाग या मतदारसंघात येतो. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ७२ झोपडपट्ट्या आहेत, यापैकी ५० च्या आसपास याच मतदारसंघात येतात. त्यामुळेच मुस्लीम-दलितबहुल, झोपडपट्टी मिश्रित आणि तितकाच स्थानिकांचाही प्रभाव असणारा हा मतदारसंघ आहे. निगडी प्राधिकरण हा उच्चवर्णीय, सुशिक्षित, सुज्ञान मतदार आणि आकुर्डी, काळभोरनगर, मोहननगर मध्यमवर्गीय मतदार आहे. दापोडीनंतर बोपखेलदेखील पिंपरीला जोडले आहे.

निरीक्षकांनी कान पिळल्याने भाजपने सोडला दावा

२००९ मध्ये भाजपचे अमर साबळे यांनी पिंपरीतून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. त्यानंतर २०१४ मध्ये ही जागा आरपीआयकडे गेली. पण भाजपचे संख्याबळ आता दुप्पट झाले आहे. पिंपरी मतदारसंघात भाजपचे १४ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे भाजपनेदेखील महायुतीतून या मतदारसंघासाठी दावा केला होता. मात्र, भाजपचे पिंपरी विधानसभा निरीक्षकांनी शहरात येत स्वपक्षीयांचे कान टोचून महायुतीधर्म पाळा असे सुनावले आहे.

या मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेविका  सीमा सावळे यांनीदेखील दावा करीत प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, त्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढविणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

महाविकास आघाडीतही तिकीटासाठी स्पर्धा

 महाविकास आघाडीतदेखील सारं काही आलबेल आहे, असे मुळीच नाही. २०१४ मध्ये निवडून आलेले माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार हे पुन्हा विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर करूनही ऐनवेळी उमेदवारीचे तिकीट अण्णा बनसोडे यांना जाहीर केल्यानं नाराज झालेल्या माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत धर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून जोरदार तयारी करत आहेत.

सर्व राजकीय समीकरणे पाहता आगामी काळात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या या मतदारसंघात तिकीट वाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चांगलीच दमछाक होणार हे मात्र नक्की. असं असलं तरी, युती आणि आघाडीचे आजी-माजी आमदार आणि इच्छुक उमेदवार हे युतीचा धर्म पाळत इमानेइतबारे पक्षश्रेष्ठींचा आदेश पाळत काम करणार का?  हे येणाऱ्या काळात समजेल. 

लोकसभा युती तर विधानसभेला आघाडीची साथ

२०१४च्या लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात लागलेला सुरुंग, २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही कायम राहिला. या धक्क्यातून सावरण्यासाठी २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मोठी खेळी खेळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पिंपरी चिंचवड शहरावर अनेक वर्ष दबदबा राखणारे अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना रिंगणात उतरवण्यात आलं. पार्थच्या रुपाने शिवसेना अर्थात युतीला मोठा धक्का देण्याचा डाव राष्ट्रवादी काँग्रेसने आखला. यासाठी पिंपरी विधानसभेतून मोठं मताधिक्य मिळेल, अशी आशा ते बाळगून होते. मात्र पार्थ पवार इथून ४१ हजार २९४ मतांनी पिछाडीवर राहिले. त्यामानाने वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांनी १७ हजार ७९४ मतं घेऊन छाप पाडली.

सुजातसाठी वंचितची चाचपणी सुरू

लोकसभेत मिळालेली मते पाहून वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभेत पिंपरी काबीज करण्याचे इरादे बाळगून आहे. म्प्रकाश आंबेडकर इथून त्यांचा मुलगा सुजात विधानसभेत पाठवण्यासाठी चाचपणी करत आहेत. सुजात येथून नशीब आजमावणार असेल तर त्यांचा सामना विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी होईल, असं तरी सध्या दिसत आहे.

खासदार बारणेंना मुख्यमंत्र्यांची समज?

खासदार श्रीरंग बारणे यांचा तिसऱ्यांदा महायुतीमधून विजय मिळवून देण्यात पिंपरी विधानसभा मतदारसंघ आणि अण्णा बनसोडे यांची ताकद खर्ची पडली आहे. महायुती नसताना खासदार बारणे यांनीच २०१४ मध्ये ॲड. चाबुकस्वार यांना काँग्रेस सोडून मातोश्रीवर नेऊन शिवसेनेत प्रवेश मिळवून देत पिंपरी विधानसभेची उमेदवारी देऊ केली होती. मात्र आता भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) महायुती असताना खासदार बारणे पिंपरीच्या जागेवर दावा करीत आहेत. त्यामुळे भाजपामधील इच्छुकांना शांत करण्याप्रमाणेच खासदार बारणे यांना समज द्यावी, अशी मागणी आमदार बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याचे बोलले जात आहे.

 

मागील निवडणुकांतील चित्र

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest