संग्रहित छायाचित्र
पंकज खोले
आयटी म्हटले की समोर येते ते तंत्रज्ञानाचे विस्तृत जाळे. गेल्या अनेक वर्षांत हिंजवडीतील काना-कोपऱ्यांत पायाभूत सुविधांसमवेत वायफायसुद्धा पोहोचले आहे. इंटेलिजन्स, सर्व्हेलन्स, सर्व्हर अशी काही आयटी बोलीभाषेत वापरले जाणारे शब्द आता सर्वत्र वापरले जाऊ लागले आहेत. मात्र, या सर्व माहिती-तंत्रज्ञान असलेल्या चहूबाजूनी कंपन्यांसाठी अद्याप सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. एमआयडीसी, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामपंचायत एवढे सर्व विभाग असूनही हिंजवडीतील सीसीटीव्हीचा प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून प्रलंबित आहे.
आयटी पार्कमध्ये कोणत्या भागांत सीसीटीव्ही बसवायचे आहेत, त्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होऊनही बराच अवधी उलटला आहे. या ठिकाणी सर्वांत गर्दीचा परिसर, आयटी कंपन्यांच्या बाहेरील भाग, परिसरातील प्रमुख चौकांत जवळपास दोनशे कॅमेरे बसवण्याचे नियोजन आहे. ते अत्याधुनिक असणार आहेत. सर्व कॅमेरे पिंपरी-चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला जोडण्यात येणार आहेत. मात्र, हे सर्व सर्वेक्षण केवळ कागदावर राहिले आहे. अद्यापि एकही कॅमेरा बसवण्यात आलेला नाही.
आयटी पार्कमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या प्रश्नावर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. भारताबाहेर अनेक कंपन्या हिंजवडीमध्ये आहेत. या पाठोपाठ हिंजवडीच्या शेजारी असलेल्या पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिका या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा बसली. मात्र, आयटी कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनकडून अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरूच आहे.
आयटी पार्कमध्ये कॅमेरे बसवण्यासंदर्भात उद्योग विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होता. त्यावेळी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी एका आठवड्याच्या अवधीत हा निधी महापालिकेला स्मार्ट सिटीसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगितले होते. मात्र, ते सर्वेक्षण आणि अहवाल कागदावरच राहिला.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा विषय २०१० पासून प्रलंबित आहे. सध्या या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने लूटमारीचे प्रकार, अपघात आदींचा तपास करणे पोलिसांना अवघड जाते. विशेष म्हणजे हिंजवडी परिसर फेज थ्री पर्यंत विस्तारला आहे.
गेल्या अनेक वर्षांत या रस्त्यावर वेगवेगळ्या घटना घडल्या. त्याची दखल अनेकदा केंद्रीय पातळीवर घ्यावी लागली होती. मात्र तरी देखील सीसीटीव्ही सारख्या महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेण्यास अजून एकाही विभागाला जमले नाही. वाहन चोरीला जाण्यापासून ते वाहतूक नियंत्रणापर्यंत सीसीटीव्ही मोलाची भूमिका बजावते. मात्र, ही बाब लक्षात येऊनदेखील त्यावर कार्यवाही होत नसल्याची खेदाची बाब आहे.
आयटी कंपन्यांसाठी काम करणाऱ्या हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने आयटी पार्कमध्ये कॅमेरे बसवण्याबाबत सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. गृह मंत्रालय, पोलीस आयुक्त, पुण्याचे पालकमंत्री यांनी त्याबाबत दखल घेण्याची मागणी केली होती. त्याबाबत अनेक बैठकादेखील झाल्या. सकारात्मक चर्चा होऊनदेखील प्रत्यक्षात कॅमेरे बसले नाहीत. तत्कालीन पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एप्रिल २०२३ मध्ये या संदर्भात एक बैठक घेतली होती. हिंजवडी असोसिएशन, पोलीस, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल आणि एमआयडीसीचे संजय देशमुख हे त्यावेळी उपस्थित होते. त्यात हिंजवडी परिसरातील सीसीटीव्हीच्या मुद्द्यावरती नव्याने प्रस्ताव तयार करून एमआयडीसीने त्याचा खर्च करावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर संपूर्ण विभाग कामाला लागला.
... तर आता एमआयडीसी करणार खर्च
हिंजवडीमधील राजीव गांधी इन्फोटेक पार्क परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचे काम पिंपरी-चिंचवडमधील स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत करण्यात येणार होते. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) स्मार्ट सिटीला १५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार होता. मात्र, पुढील प्रक्रिया न झाल्याने अखेर एमआयडीसी स्वतः या ठिकाणी कॅमेरे बसवणार आहे. त्यासाठी स्वतंत्र ठेकेदार नेमला असून, येत्या दोन ते अडीच महिन्यात त्या अनुषंगाने काम सुरू होणार आहे.
ही आहेत महत्वाची ठिकाणे
आयटी पार्कमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी वाहतूक पोलीस आणि असोसिएशन यांनी सर्व्हेक्षण केल्यानंतर ठिकाणे निश्चित केली होती. आयटी पार्कमध्ये शिवाजी चौक, विप्रो सर्कल, इन्फोसिस सर्कल, मेट्रो स्टेशनचा परिसर, चांदे-नांदेकडून येणारा रस्ता, माण रस्ता, हिंजवडी टप्पा एक ते टप्पा तीन यातील रस्ते यांचा त्यात समावेश आहे.
हिंजवडी टप्पा तीनपर्यंत सर्व परिसर दृष्टिक्षेत्रात राहील याप्रमाणे कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यासंबंधी सर्व प्रक्रिया पूर्ण केली असून, त्याचे साहित्य आले आहे. पुढील एक-दीड महिन्यांत प्रत्यक्षात काम सुरू होईल. पोलीस आणि असोसिएशन यांच्या समन्वयाने जागा निश्चित केल्या आहेत.
- संजय नखाते, उप अभियंता, एमआयडीसी
आयटी पार्कमध्ये सीसीटीव्हीबाबत बैठका सुरू आहेत. त्याच्या ठिकाणी निश्चित करण्यात येणार आहे. लवकरच ते ठिकठिकाणी कार्यान्वित होतील. यामुळे आयटी कंपन्यांची सुरक्षा आणखी वाढेल.
- कर्नल (निवृत्त) चरणजितसिंग भोगल, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर, हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन