संग्रहित छायाचित्र
पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवड शहरातही गुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या विभागांनी समन्वयाने काम करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र त्यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. वैद्यकीय विभागाने राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालाच्या आधारे शहरात अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगितले. दुसरीकडे, पाणीपुरवठा विभाग मात्र शहरात पुरवठा करीत असलेले कुठलेही पाणी दूषित नसल्याच्या दाव्यावर ठाम आहे. यामुळे शहरात जीबीएसचे रुग्ण वाढत असताना आम्ही पीत असलेले पाणी योग्य की दूषित, असा प्रश्न या आजारामुळे धास्तावलेल्या पिंपरी-चिंचवडवासियांना पडला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात जीबीएसचे १८ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. दूषित पाण्याद्वारे आजाराचा सर्वाधिक प्रसार होत असल्याने शहरातील खासगी विहिरी, बोअर, टॅंकर आणि जारमधील पाण्याची तपासणी करण्यात येत आहे. वैद्यकीय विभागाने शहरातील २३ ठिकाणचे पाण्याचे नमुने पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्याचा पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे. परंतु, पाणीपुरवठा विभागाकडून दररोज तीनशे ठिकाणे तसेच खासगी विहीर, बोअर, जारची तपासणी करूनदेखील कुठेच पाणी दूषित नसल्याचा दावा महापालिकेच्या पाणी विभागातील अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे महापालिकेचे पाणी पिण्यास योग्य की अयोग्य, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वैद्यकीय आणि पाणीपुरवठा विभागात समन्वयाचा अभाव असून संबंधित अधिकारी एकमेकांवर टोलवाटोलवी करत असल्याचे दिसून येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात आढळलेल्यया जीबीएसच्या १८ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शहरातील पाणी तपासणीची मोहीम हाती घेतली आहे. या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेले संशयित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात, त्या परिसरात महापालिकेद्वारे नळामार्फत पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने वैद्यकीय विभागाकडून तपासण्यात येत आहेत. त्यानुसार शहरातील २३ ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोग शाळेत पाठविले होते. त्यापैकी थेरगाव, पिंपरी, काळेवाडी, अजमेरा, दिघी, ताथवडे, मोशी, भूमकर वस्ती, संत तुकारामनगर परिसरातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल आला आहे.
शहरातील खासगी मालकीच्या खासगी विहिरी, बोअर, टॅंकर आणि जारमधील पाणी तपासणीस घेऊन त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकण्यात येत आहे. जीबीएस या आजारामध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. या आजाराची लागण सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. अत्यल्प रुग्णांमध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणे आढळून येत असून दूषित पाण्याद्वारे या आजाराची बाधा होण्याची शक्यता गृहित धरून महापालिकेने त्या दृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
महापालिकेचा पाणीपुरवठा विभागाकडून कोणत्याही परिस्थितीत दूषित पाण्याचा शिरकाव होणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळलेले संशयित रुग्ण ज्या भागात वास्तव्य करतात. त्या परिसरात महापालिकेच्या नळाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुने तपासले जात आहेत. यामध्ये खासगी विहिरी, बोरवेल, टँकर आणि पाण्याचे जार मार्फत पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचे नमुनेही तपासणी सुरू आहे.
शहरातील एकही विहीर, बोअर, टॅंकर आणि जारमधील पाणी दूषित नसल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आला आहे. मात्र, त्या विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडरदेखील टाकली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून घेतलेल्या नमुन्यांच्या तपासणीत नळाद्वारे आलेले पाणी दूषित असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या पाण्याच्या नमुने तपासणी कुठेच दूषित पाणी आढळले नसल्याचे सांगितले जात आहे. यावरून वैद्यकीय विभाग आणि पाणीपुरवठा विभागात जुंपली असल्याचे दिसून येत आहे.
या भागातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर संशयित रुग्ण आढळून आलेल्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणी घेण्यात आले. यामध्ये २३ ठिकाणचे पाणी नमुने तपासणीला घेण्यात आले. त्यात सुखवाणी मोशी प्राधिकरण, गाडा रोड, ताथवडे, गुरुकुल काॅलनी काळेवाडी, आनंद पार्क थेरगांव, गणेश काॅलनी भूमकर वस्ती, संत तुकारामनगर, वास्तू उद्योग अजमेरा, चौधरी पार्क दिघी, या भागातील नळ आणि बोअरचे पाणी २८ आणि २९ जानेवारी रोजी तपासणीसाठी घेण्यात आले. त्यानुसार राज्य आरोग्य प्रयोग शाळेच्या सूक्ष्मजिवीय अहवालात सदरच्या ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
विहिरी, जार आणि पाण्याच्या टँकरची तपासणी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर दररोज ३८० ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. त्याशिवाय सात दिवसात खाजगी विहिरी आणि बोअरवेलचे ७८ ठिकाणचे पाणी तपासणीला घेतले. त्यानंतर शहरातील जार भरणारे आणि टॅंकरचे असे एकूण ३६ ठिकाणचे नमुने तपासणी घेण्यात आले. यामध्ये एकाही ठिकाणी पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे दिसून आले नाही. तसेच प्रत्येक ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकली जात आहे, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
पाणीपुरवठा विभाग म्हणतो, वैद्यकीय पाणी तपासणी अहवाल अयोग्य
वैद्यकीय विभागाने पाण्याचे नमुने घेतलेल्या ठिकाणचे पाणीपुरवठा विभागाकडून पुन्हा पाण्याचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यात जीबीएस आजाराचा संशयित रुग्ण आढळलेल्या घरातील पाण्याचे नमुने विशेष करुन घेण्यात आले आहेत. वैद्यकीय विभागाने पाण्याचे जे नमुने घेतले, त्याच्या अहवालात सदर पाणी पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे नमूद केले होते. तो अहवाल राज्य आरोग्य प्रयोग शाळेतून तपासून घेतला होता. मात्र, पाणीपुरवठा विभागाने तपासलेल्या नमुन्यात एकाही ठिकाणचे पाणी पिण्यास अयोग्य नाही. हे पाणी पिण्यास योग्य असल्याचा दावा पाणीपुरवठा विभागाचे मुख्य केमिस्ट प्रशांत जगताप यांनी केला आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून केलेल्या तपासणी अद्याप कुठेही पाणी दूषित आढळून आले नाही. खासगी विहीर, बोअर या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकली आहे. ज्या भागातील पाणी दूषित आढळले आहे, त्या भागातील पाण्याची पुन्हा तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ‘ओटी सोल्युशन’ टाकून पाणी तपासण्यात येणार आहे. वैद्यकीय विभागाने पाण्याचे नमुने घेताना पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना सोबत घ्यावे.
- प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.