संग्रहित छायाचित्र
महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाकडून अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विमा योजना राबवण्यात येत आहे. मात्र, कर्मचाऱ्यांकडून 'धन्वंतरी स्वास्थ्य' योजना लागू करावी म्हणून मागणी होत आहे. तरीही महापालिकेकडून आरोग्य विमा योजनेतील काही त्रूटी दुर करण्याचे आयुक्त शेखर सिंह यांच्याकडून सुरु आहेत. या योजनेतील काही त्रूटीचे निराकरण करण्याची कार्यवाही सुरु आहे.
महापालिकेकडून अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी राबवण्यात येणाऱ्या आरोग्य विमा योजनेची अंमलबजावणी मार्च महिन्यापासून सुरु झाली आहे. मात्र, योजनेत असणा-या त्रुटींचे निराकरण करण्याची कार्यवाही सुरु आहे. महापालिकेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वी धन्वंतरी स्वास्थ्य योजना राबवली जात होती. ती बंद करून आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महापालिकेचे ७ हजार २०० अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांचा समावेश केलेला आहे. कर्मचारी व त्याची पत्नी किंवा पती आणि दोन पाल्य यांना त्याचा लाभ मिळणार आहे. त्याशिवाय, योजनेत तीन ते साडेतीन हजार निवृत्त कर्मचाऱ्यांना देखील सामावून घेतले आहे.
निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी या योजनेचा लाभ कर्मचारी व त्याची पत्नी अथवा पती यांना दिला जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या दहा हजारांपेक्षा अधिक असणार आहे. योजनेत सर्व आजार समाविष्ट आहेत. तसेच, ३ ते २० लाख रुपयांपर्यंत वार्षिक खर्चाची मर्यादा असणार आहे. याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सध्या आरोग्य विमा योजना राबविली जात आहे. योजनेतील काही त्रुटींचे आयुक्त स्तरावर निराकरण करण्याची कार्यवाही सुरू आहे.