हिंजवडी जळीत कांडातील आरोपी जनार्दन हंबर्डीकर याला पोलिसांनी रुग्णालयातून ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपी हंबर्डीकर याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सुनावणी दरम्यान, न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
9 मार्च रोजी हिंजवडी आयटी पार्क परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हलर ला आग लागून ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. यात जनार्दन हंबर्डीकर हा देखील भाजला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी ही आग लागली नसून, जनार्दन यानेच लावली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. तेव्हा पासून, जनार्दन हा रुग्णालय उपचारासाठी दाखल होता. आज त्याला डिस्चार्ज मिळताच हिंजवडी पोलिसांनी आरोपी हंबर्डीकरला ताब्यात घेतलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
हिंजवडीतील फेज 2 मधील व्योम ग्राफिक्स कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन टेम्पो सकाळी पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाले होते. त्यावेळी बुधवारी (19 मार्च) सकाळी आठच्या सुमारास अचानक टेम्पोला आग लागली. या आगीत चौघांचा होरपळून मृत्यू झाला आणि काहीजण जखमी झाले.
प्रथमदर्शनी वाहनात शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या तपासात चालक जनार्दन हंबर्डीकर यानेच जुन्या वादातून आणि कंपनी प्रशासनासोबतच्या नाराजीतून हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे, असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.
चालक हंबर्डीकर याचे काही कर्मचाऱ्यांशी वाद होते. तसेच दिवाळीत कंपनीने त्याचा पगारही कापला होता. याची चीड हंबर्डीकरच्या डोक्यात होती. त्याने व्योम ग्राफिक्स या आपल्या कंपनीतूनच मंगळवारी (दि. १८) एक लिटर बेंजिम सोल्युशन नावाचे केमिकल एक प्लास्टिकच्या बाटलीत भरून गाडीत आणून ठेवले. तसेच कापडाच्या चिंध्या सीट खाली ठेवल्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी कर्मचाऱ्यांना आणण्यासाठी गेले असता वारजे येथे एक काडेपेटी विकत घेतली. कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना हिंजवडी फेज १ परिसरात गाडी येताच आरोपीने गाडीचा ब्रेक दाबला. आगपेटीची काडी पेटवून कापडाच्या चिंध्यांना आग लावली. तेव्हा त्याच्या पायालादेखील आग लागली होती. त्यामुळे त्याने गाडीतून उडी मारली. त्यानंतर केमिकलमुळे काही वेळातच आगीचा भडका उडाला. चालकाने तातडीने गाडीतून बाहेर उडी मारली. त्यानंतर पुढील दुर्घटना घडली.
टेम्पो ट्रॅव्हलरला आग लागल्यानंतर अवघ्या सहा-सात मिनिटांत मोठा भडका उडाला होता. आग लागल्यानंतर एवढ्या कमी वेळात भडका उडू शकत नाही, हे केमिकल इंजिनिअर असणारे पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी हेरले होते. गाडीची पाहणी करताना काही गोष्टी दिसून येत होत्या. गाडीत काडी पेटी, कंपनीत वापरल्या जाणाऱ्या कापडी चिंध्या आणि केमिकलचा वास आल्यानंतर उपायुक्त गायकवाड यांनी फॉरेन्सिक टीम बोलावून ठराविक केमिकलचा वापर झाला आहे का, हे तपासण्यास सांगितले. त्यांची शंका खरी ठरली आणि नंतरच्या चौकशीतून गुन्ह्याचा उलगडा झाला.