पिंपरी-चिंचवड: 'इको जॉगिंग ट्रॅक'ची गेरा बिल्डरने लावली वाट!

पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या इको जॉगिंग ट्रॅकवर गेरा बिल्डरने खोदाई केली आहे. त्यामुळे सगळ्या 'इको जॉगिंग ट्रॅक'ची वाट लागली आहे. विनापरवानगी खोदाई केल्याने स्थापत्य विभागाकडून गेरा बिल्डरवर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Admin
  • Edited By Admin
  • Tue, 4 Jun 2024
  • 09:21 am

'इको जॉगिंग ट्रॅक'ची गेरा बिल्डरने लावली वाट!

गेरा बिल्डरने बेकायदेशीर खोदकाम केल्यामुळे लाखो रुपये खर्चून उभारलेल्या इको जॉगिंग ट्रॅकची अशी अवस्था झाली आहे. नाशिक फाटा ते लांडेवाडीपर्यंतचा हा ट्रॅक नागरिकांना फिरण्यासाठी अत्यंत उपयुक्त होता.

विकास शिंदे 
पिंपरी-चिंचवड महापालिकेने लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या इको जॉगिंग ट्रॅकवर गेरा बिल्डरने खोदाई केली आहे. त्यामुळे सगळ्या 'इको जॉगिंग ट्रॅक'ची  वाट लागली आहे. विनापरवानगी खोदाई केल्याने स्थापत्य विभागाकडून गेरा बिल्डरवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. 

महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम म्हणाले, ऐन पावसाळ्याच्या तोंडावर शहरात १५ मे नंतर कुठेही खोदाई करावयाची नाही, असे निर्बंध लादले होते. ह क्षेत्रीय कार्यालयाकडून संबंधित बिल्डरने परवानगी घेतलेली नाही. असे असतानाही गेरा बिल्डरने भूमिगत विद्युतवाहिनी  टाकण्यासाठी खोदाई केली आहे. ह क्षेत्रीय कार्यालयाकडून खोदाईचा अहवाल पाठविला आहे. विनापरवानगी खोदाई केल्याने संबंधित बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात येईल.

महापालिकेच्या स्थापत्य उद्यान विभागाने नागरिकांना चालण्यासाठी मातीचे इको जॉगिंग ट्रॅक शहरातील विविध ठिकाणी तयार केले आहेत. नाशिक फाटा ते लांडेवाडीपर्यंत लाखो रुपये खर्च करून सहा मीटर रुंद आणि एक हजार दोनशे मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक तयार केला होता. गेरा इम्पेरियल गेटवे ही गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडची बांधकाम साईट सुरू आहे. त्यांचे भोसरी येथून भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ही भूमिगत केबल टाकताना जॉगिंग ट्रॅकची खोदाई करण्यात आली आहे.

महापालिकेने नाशिक फाटा ते लांडेवाडी चौकापर्यंत इको जॉगिंग ट्रॅकचे काम केले. या जॉगिंग ट्रॅकमुळे नागरिकांची चांगली सोय झाली आहे. या ट्रॅकमुळे महामार्ग स्वच्छ ठेवण्यासही मदत होत आहे. याशिवाय सकाळी व संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरायला जाणाऱ्या नागरिकांना पादचारी मार्ग सुरक्षित राहिला आहे. मात्र, पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूला व्यावसायिकांद्वारे बांधकामातील राडारोडा, विक्रेत्यांद्वारे टाकाऊ माल, काही कंपन्यांद्वारे रसायनमिश्रित धोकादायक टाकाऊ पदार्थ टाकले जात होते. काही अज्ञात व्यक्‍तींद्वारे तर टॅक्‍टरमधून कचरा आणून रस्त्याच्या कडेला टाकण्याचे प्रकार सुरू होते. महापालिकेने नाशिक फाटा ते लांडेवाडीपर्यंत इको जॉगिंग ट्रॅकवर लाखो रुपये खर्च केले आहेत. गेरा इम्पेरियल गेटवे या नाशिक फाटा येथील बांधकाम साईटकरिता अतिरिक्त विद्युतपुरवठा हवा असल्याने भोसरी येथून २२ केवी वॅटची भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्यात येत आहे.

मुळात भूमिगत विद्युतवाहिनी टाकण्याचे काम करताना नाशिक फाटा ते भोसरी अशी खोदाई केलेली दिसत आहे. मात्र, लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या इको जॉगिंग ट्रॅकलगत मोठी चर खोदून त्या ट्रॅकची संपूर्ण वाट लावली आहे. संबंधित बिल्डरने महापालिकेच्या स्थापत्य उद्यान आणि स्थापत्य विभागाची खोदाई परवानगी घेतली आहे का?, नागरिकांना चालण्यासाठी तयार केलेला इको जॉगिंग ट्रॅक खोदाई करून खराब केला आहे. त्यामुळे संबंधित बिल्डरसह पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजय औसरमल यांनी केली आहे.

आयुक्तांचा आदेश धाब्यावर

पावसाळ्याच्या तोंडावर संपूर्ण शहरात खोदाईला स्थापत्य विभाग परवानगी देत नाही. तरीही संबंधित बिल्डरने विनापरवानगी नाशिक फाटा ते भोसरी सब स्टेशनपर्यंत खोदाई केली आहे. खोदाई करताना महापालिकेचा संपूर्ण इको जॉगिंग ट्रॅक खराब केला असून बेसुमार वृक्षांची कत्तल केली आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी १५ मे नंतर शहरात खोदाई करण्यास मनाई केलेली आहे. स्थापत्य अधिका-यांच्या आशीर्वादाने दाने बिल्डरने विद्युतवाहिनी टाकण्यासाठी खोदाई केली आहे. त्यामुळे संबंधित बिल्डरवर दंडात्मक कारवाई करून विनापरवानगी खोदाई केली म्हणून गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे स्थापत्य अधिका-यांकडून सांगण्यात आले.

असा आहे इको जॉगिंग ट्रॅक

नाशिक फाटा ते लांडेवाडी (भोसरी) या ठिकाणी इको जॉगिंग ट्रॅक बनवला आहे. या ट्रॅकवर मुरुम, दगड, मातीचा वापर करून तयार केला आहे. नैसगिक पद्धतीने ट्रॅक तयार करण्यात येत असल्याने नागरिकांना आरोग्य राखण्यासाठी लाभदायी ठरणार आहे. हा ट्रॅक सहा मीटर रुंद आणि एक हजार दोनशे मीटर लांब असा प्रशस्त आहे. पूना स्कूलजवळील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालय भिंतीलगतच्या लांडेवाडीतील ऐतिहासिक प्रवेशद्वारापर्यंत रस्त्याच्या कडेला दगड, माती टाकून सपाटीकरण केले आहे. यासाठी लाल मातीचा उपयोग केला आहे.

महापालिकेने लाखो रुपये खर्च करून हा जॉगिंग ट्रॅक बनविला आहे. गेरा बिल्डरने विद्युत वाहिनीची केबल टाकताना संपूर्ण ट्रॅक लगत मोठ्या प्रमाणात खोदाई केली. ट्रॅकचे नुकसान करत इको जॉगिंग ट्रॅक खराब केला आहे. याकडे महापालिका स्थापत्य उद्यान विभागाने दुर्लक्ष केले आहे. तसेच माती, दगडापासून बनविलेला ट्रॅक उखडल्याने आता पावसाळ्यात तो आणखी खराब होणार आहे. बिल्डरच्या बेजबाबदार कामामुळे महापालिकेचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. या बिल्डरवर विनापरवाना खोदाई करणे आणि जॉगिंग ट्रॅक खराब केल्याचा गुन्हा दाखल करून नुकसान भरपाई वसूल करावी.

–  संजय औसरमल, तक्रारदार नागरिक

महापालिकेने नाशिक फाटा ते लांडेवाडीपर्यंत इको जॉगिंग ट्रॅक तयार केला. त्याकरिता लाखो रुपये खर्च केले आहेत. या इको जॉगिंग ट्रॅकची स्थापत्य उद्यान विभागाकडून तत्काळ पाहणी करण्यात येईल. कुठे खोदाई सुरू असेल तर थांबविण्यात येईल. या बिल्डरने  इको जॉगिंग ट्रॅकच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करून संबंधितांकडून नुकसान भरपाई घेऊन योग्य कारवाईसाठी स्थापत्य विभागाला पत्र देण्यात येईल.

- मनोज सेठिया, सह शहर अभियंता, स्थापत्य उद्यान विभाग, महापालिका.

नाशिक फाटा ते भोसरी महावितरण सब स्टेशनपर्यंत गेरा बिल्डरने परवानगी न घेता खोदाई केलेली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर खोदाई करण्यास परवागनी दिली जात नाही. तरीही संबंधित बिल्डरने खोदाई केली आहे. त्यामुळे सदर खोदाईची पाहणी करून त्याचा अहवाल शहर अभियंत्यांना सादर केला आहे. बिल्डरवर दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव पाठविला आहे.

- सतीश वाघमारे,  कार्यकारी अभियंता, ह क्षेत्रीय कार्यालय, महापालिका.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story