संग्रहित छायाचित्र
शेअर मार्केटच्या नावाखाली एका नागरिकाची फसवणूक करण्यात आली. ही घटना गायकवाडनगर, दिघी येथे घडली. याबाबत ४३ वर्षीय नागरिकाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अॅप चालवणारे चालक, व्हॉटस्अॅप गु्रपचे अॅडमीन, बँक खातेदार तसेच तपासात निष्पन्न होणारे इतर आरोपी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना २९ मे ते ३१ जुलै २०२४ या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने गायकवाडनगर, दिघी येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना व्हॉटस्अॅपवर मेसेज आला की, आमच्या मार्गदर्शनाखाली शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला नफा कमवू शकता. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांचा मोबाइल नंबर वेगवेगळ्या व्हॉटस्अॅप गु्रपला जोडून घेतला. त्यानंतर फिर्यादी यांना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगून त्यात फिर्यादी यांचे स्वतंत्र खाते तयार केले. आरोपींनी सांगितल्याप्रमाणे फिर्यादी यांनी शेअर्स खरेदीसाठी काही रक्कम आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर भरली. शेअर्समध्ये नफा होत असल्याचे दिसून आल्याने फिर्यादी यांनी त्या अॅपवरून १८ लाखांचे कर्ज घेतले. तसेच फिर्यादी यांनी ३१ जुलै रोजी आरोपींच्या बँक खात्यावर १० लाख २१
हजार १२ रुपये पाठवले होते. फिर्यादी यांनी नफा झालेली रक्कम बँक खात्यावर घेण्याचा प्रयत्न केला असता त्यात तांत्रिक कारण देण्यात आले. फिर्यादी यांनी आरोपींच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधला असता त्यांनी आमच्या अॅपवर घेतलेल्या कर्जापैकी चार लाख रुपये भरा मगच तुमची रक्कम तुमच्या खात्यावर येईल, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी चार लाखांची रक्कम भरल्यावरही त्यांना पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.