संजय शिंदे: चिखली परिसरात गुरुवारी (दि. १२) रात्री साडेदहानंतर वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाला. चिखलीतील घरकुल इमारत क्रमांक ३४ मध्ये राहणारे जुबेर रफिक कुरेशी (वय २४) यांच्या घराची खिडकी उघडी राहिली होती. घरातील सर्व जण बहिणीकडे गेले होते. दरम्यान उघड्या खिडकीतून पावसाचे पाणी फ्रिज सॉकेटवर जाऊन पडले. त्यामुळे त्याठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याने घराला आग लागली. घर बंद असल्याने सर्व साहित्य जळून खाक झाले. घराच्या उघड्या खिडकीतून धूर आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडल्यावर आग लागल्याचे समजले.
आग लागल्याचे समजताच घरकुलमधील सामाजिक कार्यकर्ते मारुती जाधव आणि त्यांच्या मित्रपरिवाराने ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला. तसेच, पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या गाड्या येईपर्यंत त्यांना काहीच करता न आल्यामुळे तोपर्यंत घरातील सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते. अग्निशमन दलाचे बंब आल्यानंतर आग विझवण्यात आली. बहिणीच्या घरी गेलेला जुबेर कुरेशी आणि त्याचे आई-वडीलही घरकुलमधील घरी पोहोचले होते. मात्र, वयोवृद्ध आईवडिलांना जुबेर यांनी धीर दिला होता. आग आटोक्यात आल्यानंतर घरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी लग्नासाठी जी रोख रक्कम आणि पंचवीस तोळे सोन्याचे होत्याचे नव्हते झाले होते. घरातील सर्व साहित्य जळल्यामुळे घरात फक्त भिंतीच उरल्या होत्या. जुबेर यांच्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले होते. त्यांना सर्व जण धीर देत होते. दोन महिन्यांवर जुबेरचे लग्न आल्याने आणि त्यासाठी सोने, इतर दागिने केले होते. त्याची राख झाल्याचे पाहून इतरांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.
आगीमुळे आमच्या घराची राखरांगोळी झाली. मात्र काही झाले तरी हरायचे नाही, अशी माझ्या वडिलांची शिकवण आहे. शिक्षण करत असतानाच मी वडिलांच्या व्यवसायात मदत करत होतो. माझे दोन महिन्यांनी लग्न होणार होते. त्यासाठी रोख रक्कम आणि सोने घेतले होते. आईचेही सोने होते. या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मी माझे लग्न पुढे ढकलले आहे. फक्त घराच्या भिंती राहिल्या आहेत. मात्र वडिलांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवून पुन्हा नव्याने कष्ट करून मी उभा राहणार आहे. - जुबेर रफिक कुरेशी, चिखली घरकुल
गुरुवारी रात्री अचानक सुरू झालेल्या वादळी पावसामुळे जुबेर यांच्या घराला लागलेल्या आगीत त्यांच्या घराच्या फक्त भिंतीच उभ्या राहिल्या आहेत. चिखली घरकुलात फायर फायटिंग सिस्टिम बंद असल्याने लागलेली आग आटोक्यात आणणे शक्य नव्हते. आग आटोक्यात आणेपर्यंत घरातील सर्व साहित्य जाळून खाक झाले होते. घरकुलात अनेक वेळा वेळेत सुविधा मिळत नाहीत. पावसाळ्यात येथील स्थानिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. - कीर्ती मारुती जाधव, सामाजिक कार्यकर्त्या.
एक हात मदतीचा
चिखली घरकुलातील जुबेर रफिक कुरेशी यांच्या घराला आग लागून फक्त घराच्या भिंती राहिल्या आहेत. काही क्षणात होत्याच नव्हते झाले. कुरेशी दाम्पत्याला फार मोठा मानसिक धक्का बसला आहे. कुरेशी कुटुंब हे आमच्याच परिवारातील सदस्य आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा उभा करण्यासाठी घरकुल येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी 'एक हात मदतीचा' अशी हाक दिली आहे. कीर्ती मारुती जाधव यूथ फाउंडेशनने थोडीशी आर्थिक मदत केली. समाजातील दानशूर व्यक्तींनी या कुटुंबाला उभे करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.