गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील नेत्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर सत्तेचा माज काय असतो हे सांगण्याची गरज उरलेली नाही. विरोधकांकडूनही सातत्याने भाजपला सत्तेचा माज आलाय असा आरोप होत आहे. आधी मतदारांच्या हाता पाया पडणारे आज मतदारांना त्रास देताना दिसत आहेत. याचीच प्रचिती आज पिंपरी चिंचवडमध्ये आली. रस्त्यात वाहने लावली म्हणून भाजपच्या माजी नगरसेवकाने सगळी वाहने आडवी केलीत. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.
शहरातील वाहतूक कोंडीमुळं नागरिक त्रासलेले आहेत. अशातच, प्रभाग क्रमांक 14 काळभोर नगर मध्ये असणारे टीव्हीएस शोरूम आणि टीव्हीएस कंपनीच्या सर्विस सेंटर मध्ये येणाऱ्या असंख्या दुचाकी आणि चारचाकीमुळं परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. कंपनीत येणाऱ्या सर्व गाड्या काळभोर नगर मधून प्रवेश करणाऱ्या रस्त्याला दुतर्फा लावल्या जातात. त्यामुळं अनेकदा नागरिकांचे येथील चालकांशी वाद देखील होतात. मात्र, जेव्हा ही वेळ एखाद्या नेत्यावर येते तेव्हा या समस्येतून मार्ग काढण्याऐवजी नेत्याने थेट नागरिकांची वाहने आडवी केली. या संबंधिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
भाजपचे माजी नगरसेवक राजाभाऊ दुर्गे यांनी त्यांच्याच फेसबुकला एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये टीव्हीएस शोरूम आणि टीव्हीएस कंपनीच्या सर्विस सेंटरसमोरील सर्व वाहने आडवी करताना दिसत आहेत. तसेच, त्यांनी पोस्टमध्ये, 'माझी सटकली. या प्रचंड मानसीक त्रासामुळे माझ्यातला रुद्र अवतार जागा झाला. संपूर्ण शोरूम वाल्यांना राजू दुर्गे स्टाईल मध्ये घोडा लावून टाकला. पार्किंग केलेल्या सगळ्या गाड्या लाथेने ढकलून हाताने सरकवून पाडून टाकल्या.' असं म्हटलं आहे.
माजी नगरसेवकाचा हा प्रताप पाहता नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दुर्गे यांच्यासंदर्भात उलट सुलट चर्चा रंगली आहे. सत्तेचा माज असल्याचे नागिरकांमधून बोललं जात आहे.