संग्रहित छायाचित्र
पिंपरी-चिंचवड शहरात आषाढीवारी पालखी सोहळ्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना वाटण्यासाठी महापालिकेकडून रेनकोट खरेदी करण्यात येणार आहे. ९०० दिंडी प्रमुखांसह दहा वारकऱ्यांना हे रेनकोट दिले जाणार आहेत. मात्र, या रेनकोट खरेदीचा प्रस्ताव ऐनवेळी आणत निविदा प्रक्रिया न राबवता थेट खरेदीचा डाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी टाकला आहे. या माध्यमातून लाखो रुपयांचा अपहार केला जाऊ शकतो.
संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे. पालखी सोहळ्यातील वारकर्यांना वाटपासाठी यावर्षी महापालिकेकडून रेनकोट खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, या खरेदीची चर्चा होताच ही खरेदी रद्द करण्याची ही घाई प्रशासनाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने २०१६ मध्ये दिंडीप्रमुखांना देण्यासाठी विठ्ठल- रखुमाई मूर्ती खरेदी केल्या. त्यामध्ये अनियमितता झाली असून, २५ लाखांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप झाला. त्याचे पडसाद २०१७ च्या महापालिका निवडणुकीमध्ये उमटले अन् राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. २०१८ मध्ये भाजपच्या सत्ताकाळात ताडपत्री खरेदी करण्यात आली. त्यावरूनदेखील सत्ताधारी आणि प्रशासनावर टीका झाली.
मागितले नसतानाही खरेदीची लगीनघाई
या वादाच्या पार्श्वभूमीवर दिंडीप्रमुखांनी आम्हाला कोणतीही वस्तू देऊ नका, अशी विनंती केली. तेव्हापासून महापालिकेच्या वतीने वारकर्यांना प्रथमोपचार पेटी व पिशवी दिली जाते. मात्र, यावर्षी दिंडीप्रमुखांची मागणी नसतानाही रेनकोट खरेदीची तयारी सुरू होती. तशी मागणी जनसंपर्क विभागामार्फत भांडार विभागाकडे करण्यात आली होती. या खरेदीची लगीनघाई भांडार विभागाकडून सुरू होती. ही चर्चा वाढत असल्याने आता ही खरेदी रद्द केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भांडार विभागाला जनसंपर्क विभागाकडून रेनकोट खरेदी करण्यासाठी डिमांड पाठवली आहे. त्यात दोन्ही पालखी सोहळ्यात ९०० दिंडी सहभागी असून त्यातील प्रमुख दहा वारकऱ्यांना रेनकोट दिले जाणार होते. याकरिता सुमारे एक कोटी रुपयांची खरेदी करण्याचा डाव काही अधिकाऱ्यांनी आखला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील संस्थानकडून वारकऱ्यांना सोयी-सुविधा द्या, भेट वस्तू घेण्यास त्याचा नकार असताना हे रेनकोट खरेदी डाव नेमका कुणी आखला, याबाबत भांडार आणि जनसंपर्कचे अधिकारी बोलण्यास तयार नाहीत.
ऐनवेळी खरेदीत मलिदा कुणाचा?
महापालिकेकडून पालखी सोहळ्यातील एका दिंडीला दहा रेनकोट देण्याबाबत विचार सुरू होता. मात्र, मागील महिनाभरापासून पालखी सोहळा नियोजन बैठका सुरू आहेत. त्यावेळी रेनकोट खरेदीची कोणतीही चर्चा झाली नाही. अचानकपणे सोमवारी (दि. १६) या खरेदीची मागणी करण्यात आली. दोन दिवसांवर पालखी सोहळा असताना ऐनवेळी अशा प्रकारे खरेदीचे प्रस्ताव आणण्याचा निर्णय का, असा प्रश्न यावरून उपस्थित झाला आहे.