संग्रहीत छायाचित्र
जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी गुरूवारी (दि.19) पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत आगमन होणार आहे. तर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी शुक्रवारी (दि.20) पिंपरी चिंचवड शहरातून जाणार आहे. पालखी मार्गावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 1 हजार 800 फिरते शौचालयाची (मोबाईल टॉलयेट) व्यवस्था केली जाणार आहे.
जगद्गगुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळ्याचे गुरूवारी (दि.19) पिंपरी-चिंचवड शहरात आगमन होणार आहे. त्या दिवशी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथे पालखीचा मुक्काम असणार आहे दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.20) पालखीचे प्रस्थान होणार आहे. दुपारी दापोडी येथून पालखी सोहळा पुणे शहरात जाणार आहे. त्याच दिवशी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी शहरातून आळंदी रस्ता येथून जाणार आहे.
पालखी सोहळा आणि मुक्कामाच्या ठिकाणी महापालिकेच्या वतीने सर्व सेवा व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्वच्छतेसाठी पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जगद्गगुरू संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर एकूण 1 हजार 400 मोबाईल टॉयलेट ठेवण्यात येणार आहेत. तर, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर 400 मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मोबाईल टॉयलेटमध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था असणार आहे. तसेच, प्रकाश व्यवस्था केली जाणार आहे. हे मोबाईल टॉयलेट ड्रेनेजलाईनच्या चेंबरला जोडले जाणार आहेत. त्याची नियमित स्वच्छता केली जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले. पालखी सोहळ्याच्या चार दिवसांसाठी मोबाईल टॉयलेट पुरविण्यासाठी 1 कोटी रूपयांचा खर्च केला जाणार आहे.
पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणी व निवास व्यवस्था असलेल्या शाळेच्या आवारात मोबाईल टॉयलेट उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तेथे पुरेसे पाणी व प्रकाश व्यवस्था असणार आहे. सर्व मोबाईल टॉयलेट ड्रेनेजलाईनला जोडण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे दुर्गंधीचा प्रश्न निर्माण होणार नाही. महापालिकेच्या निर्मल वारी अंतर्गत स्वच्छतेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.