Advertisement

Pimpri-Chinchwad : रक्तदात्यांनो पुढे या..! शहरात रक्ताचा तुटवडा; वाढती रुग्णसंख्या आणि घटलेल्या दात्यांमुळे रक्तपेढ्यांवर ताण…

वायसीएममध्ये ५० पिशव्यांची दिवसाला मागणी

पिंपरी-चिंचवड शहरातील रक्तपेढ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. सद्यःस्थितीत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या रक्तपेढीत दिवसाला ५० रक्ताच्या पिशव्यांची मागणी आहे. असे असताना मात्र दिवसाला केवळ १० ते १५ दाते रक्तदानासाठी येत आहेत. एप्रिल, मे महिन्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असतो. सध्यस्थिती विविध आजारांमुळे वाढलेली रुग्ण संख्येमुळे रक्ताची मागणी वाढल्याचे निरीक्षण रक्तपेढ्यांनी नोंदविले आहे.

शहराची वाढलेली लोकसंख्या आणि वाढता विस्तार यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येतही वाढ दिसत आहे. यामुळे दररोज रक्ताची मागणी वाढत चालली असून, रुग्णांना विविध कारणांनी रक्ताची गरज लागत आहे. मात्र, त्या तुलनेत रक्तदाते मिळत नसल्याने रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होवू लागला आहे.

डेंगीचे रुग्ण आणि अन्य साथीचे आजार वाढल्यामुळे प्लेटलेट्सची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये काही दिवस पुरेल इतकाच रक्ताचा साठा शिल्लक आहे. शहरातील अनेक रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तपेढ्यांकडून रक्तातील विविध घटकांची देवाण-घेवाण होत होती. गरजूंना वेळोवेळी रक्त मिळत होते. मात्र, रक्ताचा तुटवडा भासू लागल्याने ही देवाण घेवाणही थांबली आहे.

विविध कार्यक्रम आणि सुट्यांमध्ये रक्तदान शिबिरांमध्ये खंड पडला. सध्यस्थिती स्वताहून नागरिक देखील आता रक्तदानासाठी पुढे येत नाहीत. लसीकरण, कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीमुळे नागरिक रक्तदान करीत नाहीत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये यकृत, मूत्रपिंड प्रत्यारोपण वाढत असून, अशा एका रुग्णांसाठी २० पिशव्यांची गरज भासते.

तसेच थॅलसेमिया, कर्करोग आणि अन्य आजारातील रुग्णांना रक्ताचा सुलभ पुरवठा होण्यासाठी अडचण येत आहे. अपघात, बाळंतपण अशा तातडीच्या आवश्यकतेसाठीही रक्त उपलब्ध करणे अवघड झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

शहरात सुमारे आठ ते १० रक्तपेढ्या असून, यातून शहरातील विविध रुग्णालयांना मागणीनुसार रक्तपुरवठा करण्यात येतो. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे. कर्करोग, डेंगूच्या रुग्णांची वाढती संख्या आणि शस्त्रक्रियांसाठी रक्ताची मागणी वाढली आहे. रक्तपेढ्या आणि रुग्णालये रक्तदात्यांच्या शोधात आहेत. त्यामुळे नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्यांकडून केले जात आहे.

‘बी’ आणि ‘एबी’ रक्तगटासाठी नातेवाईकांची वणवण

विशेषत: निगेटिव्ह रक्तगटाचे रक्त मिळविण्यात प्रचंड अडचणी जाणवत आहेत. पॉझिटिव्ह रक्तगटाचे रक्त उपलब्ध होत असले, तरीही प्रामुख्याने ‘बी’ आणि ‘एबी’ रक्तगटाच्या रक्त पिशव्या मिळविण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. रुग्णाच्या नातेवाईकांना ठराविक रक्तगटाच्या पिशव्यांसाठी धावाधाव करावी लागत आहे. महिलांची प्रसूती शस्त्रक्रिया, गंभीर अपघातातील रुग्ण तसेच विविध शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज लागते. त्याचप्रमाणे, गंभीर थॅलेसेमिया आजार असलेल्या रुग्णांना दर पंधरा दिवसाने किंवा महिन्याने रक्त द्यावे लागते. या सर्व रुग्णांच्या नातेवाईकांची सध्या रक्त मिळविण्यासाठी विविध रक्तपेढ्यांमध्ये धावपळ सुरू आहे.

रक्तपेढ्यांकडून दात्यांचा शोध

सध्या उन्हाळ्याची सुट्टी व परीक्षांचा कालावधी सुरु आहे. त्यानंतर एप्रिलच्या अखेर आणि मे महिन्यात सुट्यांच्या कालावधीत रक्तदान शिबिरे कमी घेतली जातात. त्यामुळे शिबिराअभावी रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस पुरेल इतकाच साठा रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असल्याने तुटवडा वाढण्याच्या भीतीने रुग्णालयांसह रक्तपेढ्यांनी दात्यांचा शोध सुरू केला आहे. शहरात प्रदूषण, त्यासोबत सध्या कर्करोग, डेंगूच्या रुग्णांची संख्याही वाढली आहे.

मागणीच्या तुलतनेत पुरवठा कमी

रुग्णालयांमधून रक्त आणि रक्ताच्या विविध घटकांची मागणी होऊ लागली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडू लागला आहे. रक्तातून काढलेले प्लेटलेट (आरडीपी) मिळत नाहीत. सिंगल डोनर प्लेटलेट मिळत नाही. केवळ प्लेटलेट काढले तरी रुग्णाची गरज भागते. शहरातील मोठ्या रुग्णालयांसह अन्य छोट्या-मोठ्या रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

आयटी कंपन्यामधील रक्तदान शिबिरे बंद

शहरात कोरोनाच्या संसर्गानंतर अनेक आयटी कंपन्यांचे कर्मचारी ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये काम करत आहेत. त्यामुळे आयटी कंपन्यांमध्ये होणारी रक्तदान शिबिरे देखील बंद झालेली आहेत. शहरात दहा ते पंधरा दिवसांचाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची टंचाई आहे. रक्त उपलब्ध न झाल्यास रुग्णांचे नातेवाईक वाद घालतात. रक्तदान झाल्याशिवाय रक्त उपलब्ध होऊच शकत नाही. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे.

स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन

शहरात सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने विविध स्वयंसेवी संस्था, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेऊन रक्‍तदान शिबिर घेण्याची गरज आहे. रक्ताला दुसरा पर्याय नसल्याने रक्तदात्यांनी केलेल्या रक्तदानानेच अत्यवस्थ रुग्णाचे प्राण वाचू शकते. त्यामुळे रक्तदानासाठी रक्‍तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे यायला हवे.

 

रक्ताचा तुटवडा एप्रिल महिन्यापासूनच सुरू झाला आहे. पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. रक्तदान शिबिरे घेण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. दररोज ५० पिशव्यांची गरज आहे. ३० पिशव्या उपलब्ध असतात. त्यामुळे एखाद्याला शस्त्रक्रिया करायची असेल, तर ती पुढे ढकलावी लागते. – दीपक पाटील, सिरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर, पिंपरी

आमच्याकडे सध्या २५ दिवसांचा रक्ताचा साठा आहे. पण, मे आणि जून महिन्यामध्ये सुट्यांमुळे रक्तदान शिबिरे होत नाहीत, तेव्हा आम्हाला रक्त पिशव्यांचा तुटवडा भासतो. सध्याला ६० ते ७० पिशव्यांची दररोज मागणी आहे. – डॉ. नीता घाटगे, रक्त संक्रमण अधिकारी, वायसीएम रक्तपेढी

आमच्याकडे सध्या पुरेसा साठा आहे. पुढील महिन्यात शाळा, कॉलेजला सुट्या असल्यामुळे तुटवडा जाणवू शकतो. गरज भासल्यास आम्ही रक्तदात्यांना बोलावतो. आमच्याकडे रक्तदात्यांची यादी असते. त्याप्रमाणे त्यांच्याशी संपर्क करून रक्ताची गरज भागविली जाते. – डॉ. मोहन कदम, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, पिंपरी

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune | समान पाणीवाटप योजनेला निर्णायक गती; अपुऱ्या आणि कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या तक्रारीमुळे पालिका प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर...

Next Post

MSRTC | विद्यार्थ्यांची 'लाल परी'लाच पसंती, शालेय सहलींतून यंदा महामंडळाने मिळवले विक्रमी उत्पन्न...