महामेट्रो प्रकल्पांतर्गत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोची कामे सुरु आहेत. परंतू, पुणे मेट्रो असेच नाव सर्वत्र घेतले जाते. त्यामुळे पुणे मेट्रोचे नामांतर करुन पिंपरी-चिंचवडचा देखील त्या नावात समावेश करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.
याबाबत उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देत ही मागणी केली आहे. त्यात म्हटले आहे की, पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महामेट्रो कार्पोरेशनची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या मेट्रो कॉर्पोरेशनच्या वतीने पुणे मेट्रो या प्रकल्पाचे नाव देण्यात आलेले आहे. या नावामध्ये पिंपरी चिंचवडचे देखील नाव समाविष्ट करावे, अशी अनेक वेळा आम्ही मागणी केलेली आहे. तरीही मेट्रो प्रशासन त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे पुणे मेट्रोच्या नावाचे नामांतर करत पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो असे करावे.
तसेच पिंपरी ते निगडी हे मेट्रोचे काम जुन्या मुंबई पुणे महामार्गावर सध्या सुरू असून चिंचवड पासून निगडी पर्यंत या रस्त्याची अत्यंत दुर्वास्था झाली आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे अपघात होऊन गंभीर जखमी झालेल आहेत. उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाला आहे.
या गंभीर विषयाबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह व मेट्रो कार्पोरेशनचे श्रावण हर्डीकर यांना पत्र व्यवहार केले. मात्र, महापालिका या रस्त्याबाबत संपूर्ण जबाबदारी मेट्रो कार्पोरेशनचे आहे अशी भूमिका सांगत आहे. मेट्रो प्रशासन या गंभीर बाबीकडे संपूर्णतः दुर्लक्ष करून शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळत आहे. याबाबत लक्ष घालून सकारात्मक निर्णय होण्याबाबत योग्य ते आदेश निर्गमित करावे, अशीही मागणी केली आहे.


