Advertisement

Pimpri Chinchwad | आरएमसी प्लांटला भाजप नेत्याचा आशीर्वाद?

– पिंपळे-निलखमध्ये महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सील तोडून अनधिकृत आरएमसी प्लांट पुन्हा सुरु,
– नेत्याने अधिकाऱ्यांना दम भरून चालकावर फौजदारी गुन्ह्याची कारवाई करण्यापासून रोखल्याचा आरोप,
– आरएमसी प्लांटचा धूर, उडणारी धूळ, सिमेंटमिश्रित कचऱ्यामुळे प्रदूषणात भर; नागरिकांच्या जीवाशी खेळ…

पिंपरी : पिंपळे निलख येथील सीएनजी पंपाच्या मागील बाजूल दोन वर्षापासून अनधिकृत रेडी मिक्स काँक्रिट (आरएमसी) प्लांट सुरु आहेत. या दोन आरएमसी प्लांटमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारीवरुन पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून आरएमसी प्लांट सील करण्यात आला, परंतु ते सील तोडून हा अनधिकृत प्लांट पुन्हा सुरु करण्यात आला आहे. सत्ताधारी भाजपच्या एका बड्या नेत्याने अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याने या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरू असल्याची चर्चा जोरात आहे.

या आरएमसी प्लांटमधून निघणारा धूर, उडणारी धूळ आणि रस्त्यावर साचलेला सिमेंटमिश्रित कचरा यामुळे परिसरात प्रदूषणाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपेत सोंग घेवून कारवाईला टाळाटाळ करत आहे. या प्लांटमुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्लांटमधून सातत्याने उडणारी धूळ, सिमेंटचे सूक्ष्म कण आणि वाहनांची वर्दळ यामुळे संपूर्ण परिसरात प्रदूषणात मोठी भर पडत आहे. परिणामी लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

राजकीय आशीर्वाद लाभल्याने पर्यावरणाचे नियम तुडवणे सुरू

बाणेर, बालेवाडी, सुस, पाषाण या भागातील बांधकाम प्रकल्पासाठी पिंपळे निलख येथून रेडी मिक्स कॉंक्रिट पुरविले जात आहे. तसेच वाकड, पिंपळे निलख भागातदेखील मोठमोठे बांधकाम प्रकल्पानांही ते दिले जात आहे. मुळात हे आरएमसी प्लांट लोकवस्तीच्या बाहेर, औद्योगिक किंवा नियोजित क्षेत्रात असणे अपेक्षित असते. मात्र, हे प्लांट येथील रहिवासी भागात सुरू आहेत. ते चालवण्यासाठी राजकीय नेत्यांचा आशीर्वाद लाभत असल्याने प्लांटचे मालक असलेले कार्यकर्ते पर्यावरणविषयक नियम, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निकष आणि महापालिकेच्या अटी-शर्ती धुडकावून लावत आहेत. धूळ नियंत्रणासाठी आवश्यक पाण्याची फवारणी, बंदिस्त यंत्रणा, हरित पट्टा यांसारख्या उपाययोजना केल्या जात नाहीत.

नागरिकांच्या तक्रारीमुळे प्लांट केला होता सील, पण…

नागरिकांच्या तक्रारीवरुन संबंधित आरएमसी प्लांट अनधिकृत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या पर्यावरण विभागाने सील लावले होते. मात्र, त्या चालकाने भाजपच्या एका बड्या नेत्याकडून अधिकाऱ्यांना दमदाटी करुन पुन्हा कारवाई करायची नाही, असा सज्जड दम भरल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे आरएमसी चालकाने हे सील तोडून पुन्हा प्लांट सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

महापालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह

एवढे गंभीर उल्लंघन होऊनही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या परिसरात कलमाडी शाळेचे खेळाचे मैदान, अकॅडमी, सार्वजनिक उद्यान, सीएनजी पंप आणि अनेक गृहनिर्माण सोसायट्या असल्याने दिवसभर लहान मुले, खेळाडू, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ असते. धुरकट वातावरणामुळे दमा, ॲलर्जी, श्वसनाचे आजार आणि डोळ्यांची जळजळ यांसारख्या तक्रारी वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पिंपळे निलख येथील आरएमसी प्लांटवर कारवाई करून सील करण्यात आले होते. मात्र, संबंधितांने सील तोडले. मात्र, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यास अधिकारी टाळाटाळ करत आहेत.प्रशासनाकडून कोणाला पाठीशी घातले जात आहे?
– रविराज काळे, शहराध्यक्ष, आप

आम आदमी पक्षासह स्थानिक नागरिकांनी याबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तक्रारी केल्यानंतर काही दिवस किरकोळ उपाययोजना केल्या जातात. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. महापालिकेची ही उदासीन भूमिका आरएमसी व्यावसायिकांना पाठीशी घालणारी असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. सील तोडून पुन्हा व्यवसाय, महापालिका मात्र मूकदर्शक; नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ तातडीने थांबवावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

महापालिकेच्या पर्यावरण विभागाकडून नागरिकाच्या तक्रारीवरुन संबंधित आरएमसी प्लॅन्टवर कारवाई करण्यात आली आहे. आरएमसी सील केले होते. पण, त्यांनी सील तोडले असेल तर पाहणी करुन तातडीने योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. – संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

प्रदूषण मंडळाचे महावितरणला पत्र

याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने देखील गंभीर दखल घेतली. नागरिकाच्या तक्रारीवरुन प्रदूषण नियंत्रण मंडळाने महावितरणला संबंधित प्लॅन्टचा वीजपुरवठा खंडित करण्याबाबत पत्र अधिकारी मंचक जाधव यांनी पाठवले आहे. तरीही आरएमसी सुरु राहिल्यास जिल्हाधिका-याच्या आदेशाने संपुर्ण साहित्य जप्त करण्याचा इशाराही दिला आहे. मात्र, महापालिकेच्या स्तरावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Digital Payment Fraud | फसवणुकीची भरपाई मिळणार? डिजिटल पेमेंट फसवणुकीपासून ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी आरबीआयने दिला नव्या नियमांचा प्रस्ताव....

Next Post

IPL 2026 (PBKS vs GT) | पदार्पणातच कॉनोलीची तुफानी फिप्टी, पंजाबची गुजरातवर मात....