पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात विद्युत वाहनांच्या (ईव्ही) नोंदणीचा वेग मंदावला आहे. वाढत्या किमती, भारित (चार्ज) करण्याच्या सुविधेचा अभाव आणि लांब पल्ल्याच्या प्रवासातील अडचणींमुळे नागरिकांकडून पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या वाहनांना पसंती मिळू लागली आहे.
पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात २०२३ मध्ये १७ हजार २७२ वाहनांची नोंद झाली आहे, तर २०२४ मध्ये १६ हजार ३९४ आणि २०२५ मध्ये १६ हजार १९० वाहनांची नोंद झाली आहे. विद्युत वाहनांची संख्या घटल्याचे प्रादेशिक कार्यालयाकडे झालेल्या वाहन नोंदणीवरून उघडकीस आले. महापालिकेच्या वतीने विद्युत वाहनांसाठी शहरात २१ ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्यासाठी मागील चार वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्याला ठेकेदाराचा प्रतिसाद मिळत नाही. त्यासाठी महापालिका चौथ्यांदा निविदा प्रसिद्ध करणार आहे.
नोंदणी घटण्याची कारणे
पेट्रोल-डिझेल वाहनांच्या तुलनेत विद्युत वाहनांची किंमत अधिक आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांना वाहन घेणे अवघड होते. लांब अंतराचा प्रवास करताना बॅटरीची मर्यादा कमी राहणे अडचणीचे ठरते. शहरात भारित (चार्ज) स्थानकांचा अभाव आहे. भारितसाठी (चार्ज) अधिकचा वेळ लागतो. त्यामुळे नोंदणी घटल्याचा अंदाज प्रादेशिक परिवहन विभागाने वर्तविला आहे.
भारितसाठी (चार्ज) लागणारा वेळ, स्थानकांची कमतरता, लांब पल्ल्यासाठी वापरता येत नसल्याने शहरात विद्युत वाहनांची खरेदी कमी होत आहे. इतर वाहनांच्या तुलनेत दरदेखील अधिक आहेत. त्यामुळे विद्युत वाहनांची खरेदी घटली झाली आहे.
-राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड


