रेल्वे स्टेशन
राजानंद मोरे
rajanand.more@civicmirror.in
पुणे रेल्वे स्थानकातील फलाटांची लांबी वाढविण्याचे काम पुढील काही दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल २८० दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या काळात प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागणार आहे.
फलाटांची लांबी वाढविण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून नियोजन केले जात असून काही लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच लोणावळा लोकल, डेमू गाड्यांवर संक्रांत येऊ शकते. हे काम टप्प्याटप्प्याने होणार असल्याने गाड्यांच्या बाबतही टप्प्याटप्याने रद्द किंवा वेळेत बदल केला जाणार आहे. काही गाड्यांना विलंबही होऊ शकतो. रेल्वेकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी पुढील सुमारे २८० दिवस प्रवाशांना प्रवासाच्या नियोजनाबाबत सज्ज राहावे लागणार आहे.
मध्य रेल्वेअंतर्गत पुणे रेल्वे स्थानक हे मोठ जंक्शन आहे. दररोज २५० हून अधिक गाड्यांची ये-जा होते, तर जवळपास दीड लाख प्रवाशांचा वापर स्थानकात असतो. स्थानकात अनेक असुविधांचा सामना प्रवाशांना करावा लागतो. त्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे, फलाटांची लांबी कमी असल्याने २४ किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या थांबविणे शक्य होत नाही. यामुळे अनेकदा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फलाट मिळत नाहीत. परिणामी, काही गाड्यांना स्थानकात येण्यासाठी विलंब होतो. बहुतेक वेळा लोणावळा लोकल किंवा डेमू गाड्यांनाच थांबावे लागते. त्यासाठी आता रेल्वेकडून फलाटांची लांबी वाढविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर एकूण सहा फलाट असून त्यापैकी एक आणि तीन फलाटावरच २४ डब्यांच्या गाड्या थांबण्याची क्षमता आहे. आता दोन, चार, पाच, सहा क्रमांकाच्या फलाटांचीही लांबी वाढविण्यात येणार आहे. फलाटांची लांबी वाढविण्याच्या कामाला २०१७ मध्ये मंजुरी मिळाली. या कामाचे बजेट सुमारे ५२ कोटी रुपयांचे असून त्यापैकी ३१ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. सध्या या कामाचे नियोजन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. फलाटांची लांबी ही मुंबईकडे जाणाऱ्या बाजूकडे वाढविण्याचे नियोजन आहे. ही लांबी वाढविताना रेल्वे मार्गही उखडावे लागणार असल्याने सर्व तांत्रिक बाबींचा विचार करून नियोजन केले जाणार आहे.
कामाचा व्याप मोठा असल्याने हे काम टप्प्याटप्याने केले जाणार आहे. एका वेळी एकच फलाट आणि मार्गाचे काम पूर्ण केले जाईल. त्यासाठी संबंधित फलाट काही दिवस बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे इतर फलाटांवर गाड्यांचा ताण वाढेल. हा ताण कमी करण्यासाठी लोणावळा लोकल गाड्या शिवाजीनगर स्थानकातून सोडण्यात येणार आहेत, तर काही लोकल रद्द केल्या जाऊ शकतात. लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द केल्या जाऊ शकतात. ह्या गाड्या सलग रद्द करता येणार नाहीत. नेमक्या कोणत्या गाड्या रद्द करायच्या, कोणत्या गाड्यांच्या वेळा बदलायच्या, याबाबत नियोजन सुरू आहे. काही गाड्या हडपसर किंवा खडकी स्थानकातूनही सोडल्या जाऊ शकतात.
फलाटांची लांबी वाढविण्याबरोबरच सिग्नलिंग यंत्रणा बसविणे, इतर तांत्रिक कामे टप्प्या-टप्प्याने करावी लागणार आहेत. त्यासाठी आवश्यकतेनुसार ब्लॉक घेण्यात येतील. त्यामुळे या कालावधीत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो. पुढील पंधरा दिवस किंवा महिनाभराच्या कालावधीत नियोजन पूर्ण करून कामाची सुरुवात होऊ शकते. सध्या पुणे विभागातील विविध विभागांकडून त्यांच्या पातळीवर या कामाच्या नियोजनावर अखेरचा हात फिरवला जात आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून संपूर्ण नियोजनाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन गाड्या सुरू करणे किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांना फलाट वेळेत उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फलाटांची लांबी वाढविण्याच्या कामाचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी टप्प्याटप्याने काही फलाट आणि रेल्वेमार्ग बंद करावे लागणार आहेत. त्याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. लवकरच यावर निर्णय होईल. यामध्ये विविध विभागांचा समावेश असल्याने सर्व विभागांची परवानगी आवश्यक आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल.
- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, पुणे विभाग