सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
राहुल शिंदे
rahul.shinde@civicmirror.in
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एकशे एकविसावा पदवीप्रदान समारंभ येत्या २७ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला असून या समारंभास केवळ ७० विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास तब्बल चार महिने उशीर झाला असून अनेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र न मिळाल्याने परदेशातील शिक्षणापासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे विद्यापीठाने पदवीप्रदान समारंभ तरी वेळेत आयोजित करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थी पदवी प्रमाणपत्रासाठी पुणे विद्यापीठाकडे अर्ज करतात. सर्व विद्यापीठांनी वर्षातून दोन वेळा पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करावे, असे यूजीसीने निर्देश दिले होते. परंतु, पुणे विद्यापीठाने २०२२ मध्ये केवळ एकदाच समारंभाचे आयोजन केले.
पुरवणी पदवीप्रदान समारंभ २७ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळील हिरवळीवर दुपारी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमास राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी, संरक्षण मंत्रालयातील संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. सतीश रेड्डी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत समारंभ पार पडणार आहे. यावेळी एकाही विद्यार्थ्याला सुवर्णपदक वितरित केले जाणार नाही. त्यामुळे पीएचडीच्या ७० विद्यार्थ्यांना या समारंभास बोलविण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे एकूण ९६८ विद्यार्थ्यांनी कॉनव्होकेशन सर्टिफिकेटसाठी अर्ज केला होता. यात पदविकेचे ५, पदवीचे ५२८, एम. फिलचे ५, पदव्युत्तर पदविकेचे ३, पीएच.डीचे ११०, पदव्युत्तर पदवीचे ३१७ अशा एकूण ९६८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यावेळी पीएच.डी च्या ११० विद्यार्थ्यांना पदवीप्रदान समारंभात तर उर्वरित विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे त्यांच्या पत्त्यावर पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार असल्याचे परीक्षा विभागातील उपकुलसचिव व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अनिल लोखंडे यांनी सांगितले. विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ पार पडल्यानंतर संलग्न महाविद्यालयांमध्ये समारंभाचे आयोजन केले जाते. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयात प्रमाणपत्र दिले जाणार आहे. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी पुरवणी पदवीप्रदान समारंभास यावे, असा प्रयत्न विद्यापीठ प्रशासनातर्फे केला जात होता. परिणामी तब्बल चार महिने समारंभाचे आयोजन लांबले. त्यामुळे आता ७० विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटचे वितरण करण्यासाठी राष्ट्रपतींना बोलावले जाणार होते का, असा प्रश्न उपस्थित होतो.
कोरोना काळात प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट दिले जात होते. मात्र, यंदा सर्व पीएच.डीच्या विद्यार्थ्यांना या समारंभास निमंत्रित करण्यात आले. परंतु, त्यातील केवळ ७० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत होकार कळवला आहे.
कॉन्व्होकेशन सर्टिफिकेटवर विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यामुळे विद्यापीठाने पदवीप्रदान समारंभ नियोजित वेळेत घेणे गरजेचे आहे. विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विद्यापीठाने कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट देण्याबाबत लवचिक भूमिका घ्यायला हवी.
- संतोष ढोरे, माजी अधिसभा सदस्य