पब्लिक टॉयलेट प्रायव्हेट लिमिटेड

राहण्यायोग्य शहर, स्वच्छ भारत मिशनमध्ये वरचा क्रमांक मिळवण्यासाठी पुणे महापालिकेने कंबर कसली आहे, पण दुसरीकडे पायाभूत सुविधांमध्ये पालिका मागास असल्याचे समोर आले आहे. शहराच्या विविध भागातील स्वच्छतागृह कुलूपबंद असल्याचे `सीविक मिरर`च्या पाहणीत आढळून आले आहे, तर सुरू असणाऱ्या मुताऱ्या इतक्या अस्वच्छ आहेत की आत पाऊल ठेवणेही शक्य होत नाही. तर अनेक स्वच्छतागृहे बंद आहेत. खासगी ठेकेदारांच्या टेंडरसाठी जाणून बुजून स्वच्छतागृहे बंद अथवा अस्वच्छ ठेवली जात आहेत.

public toilet private limited

खासगी ठेकेदारांच्या टेंडरसाठी अनेक स्वच्छतागृह ठेवली बंद; `सीविक मिरर`च्या पाहणीत उघड

तन्मय ठोंबरे 

tanmay.thombre@civicmirror.in

TWEET@tanmaytmirror

राहण्यायोग्य शहर, स्वच्छ भारत मिशनमध्ये वरचा क्रमांक मिळवण्यासाठी पुणे महापालिकेने कंबर कसली आहे, पण दुसरीकडे पायाभूत सुविधांमध्ये पालिका मागास असल्याचे समोर आले आहे. शहराच्या विविध भागातील स्वच्छतागृह कुलूपबंद असल्याचे `सीविक मिरर`च्या पाहणीत आढळून आले आहे, तर सुरू असणाऱ्या मुताऱ्या इतक्या अस्वच्छ आहेत की आत पाऊल ठेवणेही शक्य होत नाही. तर अनेक स्वच्छतागृहे बंद आहेत. खासगी ठेकेदारांच्या टेंडरसाठी जाणून बुजून स्वच्छतागृहे बंद अथवा अस्वच्छ ठेवली जात आहेत.

जी-२० परिषदेसाठी काही स्वच्छतागृह पडद्याने झाकणाऱ्या महापालिकेच्या कारभारामुळे नागरिकांना उघड्यावर लघुशंका करावी लागत आहे. याबाबतचे तथ्य जाणून घेण्यासाठी पाहणी केल्यानंतर संबंधित मुताऱ्यांमधील दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे तिथे पाऊल टाकणेही शक्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळेही अनेक नागरिक उघड्यावर लघुशंका करीत असल्याचे दिसून येत आहे.

जी-२० परिषदेदरम्यान पुण्यात आलेल्या परदेशी पाहुण्यांसमोर पुणे महापालिकेने चकचकीत चित्र निर्माण केले होते. पण हा चकचकीतपणा किती फोल आहे, याचा कटू अनुभव सर्वसामान्य नागरिकांना रोजच घ्यावा लागत आहे. नागरिकांना शहरात ठिकठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह, मुताऱ्या उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. रस्ता, पाणी या पायाभूत सुविधांप्रमाणेच ही सुविधाही तितकीच महत्त्वाची आहे. स्वच्छतागृहांचे नुसतेच इमले उभारून त्याचा उपयोग होत नाही. त्याची देखभाल-दुरुस्ती, स्वच्छताही वेळच्या वेळी होणे गरजेचे आहे. नेमके यामध्येच पालिकेने सध्यातरी ढिलाई केल्याचे दिसते.

पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये १५ हजारांहून अधिक सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत. सध्या वॉर्ड स्तरावरून त्यांची देखभाल-दुरुस्ती व स्वच्छतेची कामे महापालिकेकडून केली जातात. अनेक वेळा अपुरे कर्मचारी, इतर कामे, कर्मचाऱ्यांची ढिलाई यामुळे स्वच्छता राखली जात नाही. देखभाल-दुरुस्तीची कामेही रेंगाळत आहेत. त्यामुळे महापालिकेकडून आता झोनल पातळीवरून ही कामे केली जाणार आहेत. पाच झोनमध्ये प्रत्येकी तीन याप्रमाणे पंधरा क्षेत्रीय कार्यालये आहेत. या कामांसाठी आता खासगी ठेकेदारांची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी झोनल पातळीवरच निविदा प्रक्रियेचे काम सुरू आहे. प्रत्येक झोनमध्ये वेगळा ठेकेदार असेल. त्यामुळे ही कामे लवकरात लवकर होतील, असा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

परिणामी, सध्यातरी स्वच्छता व देखभाल दुरुस्तीच्या कामांना ब्रेक लागला आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागातील स्वच्छतागृह बंद आहेत. अनेक मुताऱ्यांचा वापरही नागरिकांकडून होताना दिसत नाही. अनेक मुताऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला आहेत. नागरिक त्यालगतच लघुशंकेला उभे राहतात. त्यामुळे महिलांसह इतरांची कुचंबणा होत आहे. त्यातच महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची संख्या खूपच कमी आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहांचाच त्यांना वापर करावा लागतो. पण काही स्वच्छतागृह बंद असल्याने तर अनेक ठिकाणी अस्वच्छ असल्याने अनेक महिला त्याचा वापर करण्याचे टाळतात. त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे यापूर्वी विविध अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त आशा राऊत `सीविक मिरर`शी बोलताना म्हणाल्या, सध्या स्वच्छतागृहांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी झोनल पातळीवर निविदाप्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी दुरुस्तीची कामे थांबविली नाही. ही कामे सुरूच आहेत. काही झोनची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच ठेकेदाराकडून कर्मचारी व पालिकेचे कर्मचारी एकत्रितपणे कामाला सुरुवात करतील. प्रत्येक झोनमध्ये स्वच्छतागृहातील १५० सीटचे क्लस्टर करण्यात आले आहे. ठराविक कर्मचारी त्याच ठिकाणची स्वच्छता करतील. त्यामुळे या कामांना विलंब होणार नाही. पूर्वी विविध कारणांमुळे स्वच्छता तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे रेंगाळत होती, असेही राऊत यांनी सांगितले.  

मुताऱ्यांची स्वच्छता अनेक दिवस होत नाही. त्यामुळे दुर्गंधी सुटते. आत जाणेही मुश्किल होते. पदपथावरून किंवा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनाही त्याचा त्रास होतो, असे शिवाजीनगर परिसरातील एका मुतारीजवळ उघड्यावरच लघुशंका करणाऱ्या नागरिकाने सांगितले. रस्त्याने महिला, लहाने मुले जात असतात. आम्हालाही असे बाहेर उघड्यावर उभे राहणे योग्य वाटत नाही. त्यामुळे पालिकेने स्वच्छता व देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story