पादचारी जमात बिचारी...

रस्त्यांचा राजा असलेले पादचारी पुण्यातील रस्त्यांवर उपेक्षितच आहेत. त्यातच महापालिकेच्या उदासिनतेमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सातत्याने रेड सिग्नल मिळत आहे. चौकाचौकांमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र सिग्नल असणे अपेक्षित आहे, पण अनेक चौकांमधील हे सिग्नल बंद असून पालिकेला मागील एक-दीड वर्षांपासून त्यांच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. शहरातील नेमके किती पादचारी सिग्नल बंद आहेत, हेच प्रशासनाला माहिती नाही. सध्यातरी विविध चाळीस चौकांतील सिग्नल दुरुस्त करण्याचा प्रस्ताव असला तरी अजूनही त्यांना वित्तीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांवर जीव मुठीत धरून धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडण्याची वेळ आली आहे.

पादचारी

पादचारी सिग्नल बंद; पालिकेच्या उदासिनतेमुळे रस्ता ओलांडणे म्हणजे प्राणाशी गाठ

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@Rajanandmirror

रस्त्यांचा राजा असलेले पादचारी पुण्यातील रस्त्यांवर उपेक्षितच आहेत. त्यातच महापालिकेच्या उदासिनतेमुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सातत्याने रेड सिग्नल मिळत आहे. चौकाचौकांमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र सिग्नल असणे अपेक्षित आहे, पण अनेक चौकांमधील हे सिग्नल बंद असून पालिकेला मागील एक-दीड वर्षांपासून त्यांच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळालेला नाही. शहरातील नेमके किती पादचारी सिग्नल बंद आहेत, हेच प्रशासनाला माहिती नाही. सध्यातरी विविध चाळीस चौकांतील सिग्नल दुरुस्त करण्याचा प्रस्ताव असला तरी अजूनही त्यांना वित्तीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे पादचाऱ्यांवर जीव मुठीत धरून धोकादायक पद्धतीने रस्ता ओलांडण्याची वेळ आली आहे.

रस्त्यावर पहिला अधिकार हा पादचाऱ्यांचा असतो. त्यामध्ये रस्त्यावर त्यांच्यासाठी पदपथ, रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंग, वेगनियंत्रक अशा सुविधा देणे अपेक्षित आहे. भारतीय रस्ता काँग्रेसच्या शिफारशींनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अशा सुविधा पुरविणे बंधनकारकच आहे. पुण्यात अनेक रस्त्यांवर या सुविधा नावालाच दिसतात. त्याचा फारसा उपयोग पादचाऱ्यांना होत नाही. शहरामध्ये जवळपास २५० हून अधिक चौकांमध्ये सिग्नल यंत्रणा आहे. या सिग्नलमध्ये पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र सिग्नल असणे अपेक्षित आहे. बहुतेक सिग्नलमध्ये तसे बदल केलेले असतात. त्यानुसार पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वेळ दिला जातो. सिग्नलवर हिरव्या रंगातील पादचाऱ्याचे चित्रही झळकते. लाल रंगाचे चित्र आल्यास पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडू नये, असा त्याचा अर्थ आहे. मात्र, हे सिग्नल क्वचित चौकांमध्ये दिसून येत आहेत.

स्वारगेट येथील जेधे चौक, बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, डेक्कन, जंगली महाराज रस्ता, फर्ग्युसन रस्ता, लोकमान्य टिळक चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक यांसह विविध मोठ्या रस्त्यांसह चौकांमध्ये पादचारी सिग्नल दिसत नाहीत. बहुतेक सिग्नल बंद आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, शाळकरी मुलांसह दिव्यांगांना प्रमुख चौक ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याबाबत महापालिकेला फारसे गांभीर्यच नसल्याचे समोर आले आहे. शहरात बंद पडलेल्या या सिग्नलच्या दुरुस्तीसाठी मागील एक ते दीड वर्षांपासून केवळ प्रस्तावाच्या पातळीवरच चर्चा सुरू आहे.

काम न केल्याने निधी गेला परत

शहरातील चाळीस चौकांमधील पादचारी सिग्नल दुरुस्त केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाचे मुख्य अभियंता श्रीनिवास कंदुल यांनी दिली, पण त्यासाठी अद्याप वित्तीय मंजुरीच मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. २०२१-२२ या वर्षात दुरुस्तीसाठी निधी मंजूरही झाला होता.

 

प्रत्यक्षात कामच न झाल्याने निधी परत गेला. त्यामुळे हे काम लांबत गेले. आता विद्युत विभागाकडून नव्याने वित्तीय मंजुरी घेतली जाणार आहे. ही मंजुरी मिळाल्याशिवाय काम सुरूच होणार नाही. तरीही मार्च अखेरपर्यंत मंजुरी घेऊन कामे पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे समजते.

विद्युत विभागातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी पादचारी सिग्नल बसविणे व दुरुस्तीचे काम पाच-सात वर्षांपूर्वी केलेले आहे. अनेक सिग्नल बंद पडलेले आहेत. त्यापैकी चाळीस सिग्नल दुरुस्त करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. वित्तीय मंजुरी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, पण सध्या किती सिग्नल बंद आहेत, याबाबत माहिती उपलब्ध नाही. काही चौकांतील सिग्नल वाहतूक पोलिसांकडूनच बंद करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटीकडूनही नवीन सिग्नल यंत्रणा उभारली जात आहे. ते चौक वगळून इतर चौकांमधील सिग्नल महापालिकेकडून दुरुस्त केले जाणार आहेत.

दरम्यान, पादचारी सिग्नलसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे पुणे सेव्ह ट्रॅफिक मूव्हमेंटचे प्रमुख हर्षद अभ्यंकर यांनी पालिकेच्या या कारभारावर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, २०२१-२२ या वर्षापासून हा प्रस्ताव आहे. निधी असूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही. आता वित्तीय मंजुरीत सिग्नल अडकले आहेत. पुढील काही दिवसांत त्याला मंजुरी मिळून काम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. पादचारी सिग्नल अनेक चौकांमध्ये आहेत. मात्र ते बिघडल्यानंतर तातडीने दुरुस्त होत नाहीत. आतापर्यंत बहुतेक पहिल्यांदाच एवढे सिग्नल दुरुस्त करण्याचे काम  हाती घेतले जात असावे.

पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र सिग्नल यंत्रणा असली तरी अनेक वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवरच वाहने उभी करतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या मधूनच रस्ता पार करावा लागतो. काही वाहनचालक रेड सिग्नल असूनही वाहने दामटतात. परिणामी, पादचारी या गर्दीतूनच मार्ग काढत पुढे जातात. यामध्ये सर्वाधिक हाल ज्येष्ठ नागरिकांचे होतात. सध्या अनेक चौकांमध्ये पादचाऱ्यांसाठी ठराविक वेळ रस्ता पार करण्यासाठी दिला जातो. पण त्याकडे दुर्लक्ष करून वाहनचालक संधीच देत नाही. काही ठिकाणी वाहतूक पोलिसांकडूनच वाहनांना या वेळेतच ग्रीन सिग्नल दिला जात असल्याचे पाहायला मिळते.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story