नेमके आंधळे कोण?

महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर एकमेकांना आधार देत रस्त्याने जाणाऱ्या दोन अंध विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसची मंगळवारी (ता. ३१) सकाळी जोरदार धडक बसली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, पीएमपी बसने दोघांनाही समोरून धडक दिली आहे. त्यामुळे समोरून येणारे अंध विद्यार्थी चालकाला कसे दिसले नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्यांकडे पांढरी काठी नव्हती, असे सांगून पीएमपीतील काहींनी विद्यार्थ्यांना दोष देण्याचा प्रयत्न केला.

गरवारे महाविद्यालयासमोर पीएमपीने दोन विद्यार्थ्यांना मंगळवारी उडवले.

पीएमपी चालकाने दोन अंध महािवद्यालयीन विद्यार्थ्यांना उडवले

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

महाविद्यालयातून बाहेर पडल्यानंतर एकमेकांना आधार देत रस्त्याने जाणाऱ्या दोन अंध विद्यार्थ्यांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसची मंगळवारी (ता. ३१) सकाळी जोरदार धडक बसली. या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, पीएमपी बसने दोघांनाही समोरून धडक दिली आहे. त्यामुळे समोरून येणारे अंध विद्यार्थी चालकाला कसे दिसले नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. या विद्यार्थ्यांकडे पांढरी काठी नव्हती, असे सांगून पीएमपीतील काहींनी विद्यार्थ्यांना दोष देण्याचा प्रयत्न केला.

वैभव क्षीरसागर आणि मयूरी गरुड अशी अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोघेही आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिकत आहेत. वैभव हा पदव्युत्तर पदवीच्या प्रथम वर्षात तर मयूरी ही पदवीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. ती सध्या मोशी येथील शासकीय वसतिगृहात राहात असून, मूळची बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आहे. वैभव हा मूळचा हिंगोलीचा असून सध्या वारजे माळवाडीत राहतो. उच्च शिक्षणासाठी दोघेही पुण्यात आले आहेत. दोघांच्या घरची आर्थिक स्थिती बेताची आहे.

महाविद्यालयातील काम संपवून दोघे सकाळी अकराच्या सुमारास रस्त्याच्या कडेने डेक्कनच्या दिशेने जात होते. त्याचवेळी डेक्कनकडून येणाऱ्या पुणे स्टेशन ते एनडीए गेट या मार्गावर धावणाऱ्या बसने दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोघेही रस्त्यावर जोरदार आपटले. त्यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलवून उपचार सुरू करण्यात आले. मंगळवारी सायंकाळपर्यंत दोघांचीही प्रकृती चिंताजनक होती. त्यांचे कुटुंबीय पुण्यात येण्यासाठी निघाले आहे.

पीएमपी प्रशासनाकडून वैभव व मयूरीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च केला जाणार आहे. याबाबत पीएमपीचे जनसंपर्क अधिकारी सतीश गाटे म्हणाले, ''अपघातातील दोन्ही जखमी अंध विद्यार्थ्यांचा संपूर्ण उपचाराचा खर्च पीएमपीकडून केला जाणार आहे. अपघातानंतर पीएमपीचे अधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांना सर्वतोपरी मदत सुरू केली. बसचालकावर आता नियमानुसार कारवाई केली जाईल. गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.'' शिवराज काळे असे चालकाचे नाव असून तो दोन वर्षांपासून पीएमपीच्या सेवेत कार्यरत आहे.

 

पांढऱ्या काठीचे लंगडे समर्थन

दरम्यान, अपघातानंतर पीएमपीच्या काही कर्मचाऱ्यांसह चालकाने अंध विद्यार्थ्यांकडे पांढरी काठी नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्याकडे पांढरी काठी असती तर कदाचित अपघात झाला नसता. चालकाला ते विद्यार्थी अंध आहेत, हे समजले असते, असा दावा एका कर्मचाऱ्याने केला. अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना संतोष पोळ यांच्यासह महाविद्यालयातील कर्मचारी भरत मिसाळ यांनी मदत केली. याबाबत मिसाळ म्हणाले की, विद्यार्थी अंध असो वा नसो चालकाचीच चूक होती. या भागात विद्यार्थ्यांना रस्ता पार करण्यासाठी जागा नाही. त्यांना मोठा वळसा घालून बसस्थानकाकडे जावे लागते. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे.

 

पीएमपी चालकाचीच चूक

वैभवचा मित्र असलेल्या ज्ञानेश्वर वाबळे यांने पांढऱ्या काठीच्या मुद्यावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला की, दोघांच्या हातात पांढरी काठी असो किंवा नसो, पीएमपी प्रशासन अपघातापासून दूर जाऊ शकत नाही. चालकाचीच चूक आहे. समोरून येणारे विद्यार्थी त्याला दिसले नाहीत. याचा अर्थ चालकाने बस चालविताना निष्काळजीपणा केला. त्यामुळे इथ पांढऱ्या काठीचा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे आहे.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story