कोयते जप्त करण्याच्या एका कारवाईत पोिलसांनी पकडलेले आरोपी.
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
‘कोयता पकडा, एक गुण मिळवा,’ ‘पिस्तूल पकडा, दहा गुण मिळवा’ अशा योजना सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांसाठी सुरू असून त्या यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले आहे. याेजना लागू झाल्यापासून दिवसाला ८-१० कोयते पकडले जाऊ लागले आहेत.
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. पुढील दहा दिवस ही योजना सुरू राहणार आहे. या अंतर्गत प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या पोलीस ठाणे/शाखा यांना प्रशस्तिपत्र आणि बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना जाहीर होण्यापूर्वी २१ दिवसांत २१ कोयते-तलवार आणि ८ पिस्तूल पकडले गेले होते. योजना लागू झाल्यानंतर कोयते जप्त होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले.
गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये गुन्हेगारी वाढल्याची ओरड केली जात आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अंतर्गत येणाऱ्या मावळ तालुक्यात कोयता गॅंगने धुडगूस घातला होता. त्यामुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडल्याचा आरोप झाला. मावळ तालुक्यातील संबंधित गॅंगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मात्र, तरीही त्यांची पिलावळ अजूनही मोकाटच आहे. यातच चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगूल वाजल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी घातक शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांची उचलबांगडी करण्याची मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.
प्रथम तीन क्रमांक येणा-या पोलीस ठाणे/शाखा यांना प्रशस्तिपत्र व बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच, कमी दर्जाची कामगिरी करणा-या शेवटून तीन पोलीस ठाणे/शाखा यांची नोंद घेतली जाणार आहे. त्यामुळे पहिला क्रमांक कोण पटकावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोहिमेसाठी पोलिसांनी मागील पंधरा वर्षात शस्त्र बाळगल्याप्रकरणी कारवाई केलेल्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली आहे. या रेकॉर्डनुसार गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू आहे.
तलवार, कोयता, पालघन, पिस्तूल वापरून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांनी शस्त्रे कुठून आणली? कशी आणली तसेच, शस्त्र कोणासाठी आणले, याबाबतची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. शहरात अवैध शस्त्र मिळू नये, यासाठी खब-यांचे जाळे तयार करून, घराघरामध्ये संपर्क तयार करावा. तरुण मुले, कामगार, विविध संघटना यांच्याकडून माहिती घ्यावी. हद्दीत पिस्तुलाचा वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे चौबे यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
पोलीस ठाणे/ शाखा यांच्याकडून केल्या जाणाऱ्या शस्त्रविरोधी कारवाईकडे आयुक्तालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त मनोज लोहिया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांना नियंत्रण कक्षाकडून दररोज अहवाल पाठवला जात आहे. शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कारवाई होणे, हा या मोहिमेचा मूळ उद्देश आहे. ज्यामुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील. पोलीस ठाणे/ शाखा यांच्या कामगिरीचे गुणांकन पद्धतीने मूल्यमापन केले जात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.