वैष्णवी पाटील यांनी तब्बल साडेबारा लाख िबयाणांची बंॅक साकारली आहे
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
घरात दररोज गोळा होणाऱ्या दुधाच्या पिशव्यांचा अनोखा वापर करीत पिंपरी-चिंचवडमधील एका महिलेने साडेचार हजार फळा-फुलांची रोपं तयार केली आहेत. वृक्षारोपणासाठी ही रोपे राज्यभर वाटण्यात आली आहेत. याशिवाय साडेबारा लाख बियाणांचे संकलन करण्याची कामगिरीही त्यांनी केली.
आहे. यातील बहुतांश रोपे तयार करण्यासाठी मंडईत वाया जाणाऱ्या फळांच्या बियांचा वापर केला आहे.
भोसरी स्पाईन रोडवर राहणाऱ्या वैष्णवी विनायक पाटील या गेल्या बारा वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करत आहेत. गेल्या सात वर्षांमध्ये अतिशय दुर्मीळ झाडांच्या बियांचे संकलन करून विविध सामाजिक संस्थांना आणि निसर्गप्रेमींना त्याची रोपे तयार करून दिली आहेत.
घरामध्ये साठणाऱ्या दूध पिशव्यांचे करायचे काय, हा प्रश्न पाटील यांना पडत होता. त्यातून त्यांना या पिशव्यांमध्ये फळा-फुलांची रोपे जोपासण्याची युक्ती सुचली. कालांतराने त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्या आणि परिचितांनी घरी आल्यानंतर त्या त्यांचा संकल्प सांगत असत. घरामध्ये अतिरिक्त रोपं तयार झाल्यानंतर पाटील यांनी ही रोपे परिचितांना भेट म्हणून देण्यास सुरुवात केली. ज्यांना भेट दिली त्यांनी त्यांच्याकडील पिशव्या पाटील यांना दिल्या. यातून अनेक मैत्रिणींच्या मुलांनीदेखील घरामध्ये या पिशव्यांचे संकलन करत त्यामध्ये रोप लावण्यास सुरुवात केली. यातूनच पाटील यांना ही संकल्पना व्यापक स्वरूपात पुढे आणण्याचा विचार आला.
‘सीविक मिरर’ शी बोलताना पाटील म्हणाल्या, आतापर्यंत बारा लाखाच्या आसपास फळा-फुलांच्या बिया संकलित केल्या आहेत. घराजवळील भाजी मंडईमधील वाया जाणारी फळे त्या घरी आणून त्याच्या पासून ही रोपे तयार करतात. त्यांनी देशी झाडांची रोपवाटिका तयार केली. त्यानंतर अनेक शेतकरी बांधवांना, नागरिकांना रोपे विनामोबदला वाटप करण्याचे काम पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांसह सहकारी सध्या करीत आहेत. यासाठी त्यांनी प्लास्टिक कचरा जनजागृतीचे कार्य करून संकलन केंद्र चालू केले आहे.
परिचित महिलांना त्यांनी दुधाच्या आणि तेलाच्या पिशव्या स्वच्छ धुऊन कोरड्या करून पुनर्वापरासाठी, रोपे तयार करण्यासाठी कसा प्रभावी वापर होऊ शकतो याचे मार्गदर्शन पाटील करतात. त्यांनी ज्या ज्या लोकांना ही माहिती दिली ते पाटील यांना दुधाच्या-तेलाच्या पिशव्या आणून देतात.
आतापर्यंत अंदाजे चार हजाराच्या वर पिशव्यांमध्ये विविध सामाजिक संस्था, रोपवाटिका, शाळांमध्ये रोपे तयार करण्यासाठी पाटील यांनी दिली आहेत. महिलांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तसेच वाढदिवसाच्या निमित्त भेट स्वरूपात त्यांनी ही रोपे देण्याच्या उपक्रमात अनेकांना सहभागी करून घेतले आहे. आळंदीतील सिद्धबेट येथे वृक्ष संवर्धन आणि स्वच्छतेवरही त्या काम करत आहेत. वैयक्तिक पातळीवर अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांनी पर्यावरण संवर्धन कार्यासाठी सर्वांना एकत्रित करीत आरंभ फाउंडेशनची स्थापना केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची बीजतुला करून त्या सह्याद्री देवराईला दिल्या आहेत. या मोहिमेतून सव्वादोन लाख बिया त्यांच्याकडे जमा झाल्या. सयाजी शिंदे आणि ट्री मॅन ऑफ इंडिया, ग्रीन आर्मी महाराष्ट्राचे ब्रँड अँबेसिडर विष्णूजी लांबा यांनी पाटील यांच्या कामाचे कौतुक करून दूध आणि प्लास्टिकच्या पिशव्यांचा पुनर्वापर कशा पद्धतीने केला जातो याची प्रत्यक्ष पाहणी केली आहे.