ऱ्हिदम सोसायटी
रोहित आठवले
rohit.athavale@civicmirror.in
TWEET@RohitA_mirror
सरकारी जमिनीवर असलेल्या अतिक्रमित झोपड्यांमुळे शेजारील गृहसंकुलात राहणाऱ्या नागरिकांना दररोज विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावे यासाठी काळेवाडी फाटा येथील ‘ऱ्हिदम’ या गृहसंकुलातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहेत.
काळेवाडी फाटा येथून डांगे चौकाकडे जाताना डाव्या बाजूला रिकामा मोठा भूखंड आहे. या भूखंडावर गेल्या काही वर्षांमध्ये झोपड्या वाढत असून, झोपडपट्टीत राहणाऱ्यांकडून पाळण्यात आलेली डुकरे सोसायटीत घुसतात. त्याचबरोबर दारुडे भर रस्त्यात दारु पिऊन धिंगणा घालतात. भरदिवसा उघड्यावरच अनैसर्गिक अश्लील कृत्य केले जाते. हा सर्व प्रकार या सोसायटीतील नागरिकांच्या नजरेसमोर घडत असतो. यामुळे शेजारील ‘ऱ्हिदम’ गृहसंकुलात राहणाऱ्या सर्वच वयोगटातील नागरिकांना विशेषत: महिलावर्गाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त केल्यानंतर रिकामे भूखंड पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) तर विकसित भूखंड परिसर (इमारती) पिंपरी-चिंचवड महापालिकेला हस्तांतरित करण्यात आला. काळेवाडी फाटा येथील हा भूखंड पीएमआरडीएच्या मालकीचा आहे. शहरातील कचरा थेट मुख्य डेपोत नेण्यापूर्वी तो वॉर्डस्तरावर संकलित केला जात होता. त्यासाठी महापालिकेकडून याच भूखंडाचा वापर होत होता. त्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली होती. ‘ऱ्हिदम’ मधील नागरिकांनी महापालिकेला याबाबत पत्रव्यवहार आणि आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून तक्रार केल्यानंतर येथील कचऱ्याचे डंपिंग बंद करण्यात आले. परंतु, हा भूखंड पीएमआरडीएचा असल्याने येथील अतिक्रमण काढण्याबाबत महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग कार्यालयाकडून पीएमआरडीएशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
‘ऱ्हिदम’मधील नागरिकांनी रोजच्या त्रासाला वैतागून स्थानिक पोलीस, स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. परंतु, जागा मालकी पीएमआरडीएची असल्याने ‘तुम्ही त्यांना अतिक्रमण काढण्यास सांगा’ या मागणीवर ‘ऱ्हिदम’मधील नागरिकांना लोकप्रतिनिधींकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. पीएमआरडीएकडे पाठपुरावा केल्यावर मध्यंतरी येथे अतिक्रमण कारवाईसाठी पथक आले होते. परंतु, तेव्हा कथित सामाजिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी या कारवाईस विरोध केला. त्या संदर्भात पीएमआरडीए कार्यालयावर मोर्चादेखील काढण्यात आला होता. परिणामत: नव्याने वसलेल्या झोपड्या काढण्यास मुदतवाढ देण्यात आली.
कावेरीनगर भाजी मंडईजवळ एक जुनी झोपडपट्टी असून, तेथे राहणाऱ्यांकडून त्रास होत नसल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. परंतु, पीएमआरडीएच्या जागेवर नव्याने झोपड्या वाढण्यास सुरुवात झाली असून, आता त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य असल्याची ‘ऱ्हिदम’मधील नागरिकांची तक्रार आहे.
दहशतीमुळे सोसायटीतून बाहेर
पडण्याचीही वाटते भीती
या मोकळ्या जागेत दारू पिणे, अश्लील कृत्य करण्याचे प्रकार सर्रासपणे घडत आहेत. दारूचे ग्लास आणि बाटल्या आमच्या सोसायटीच्या आवारात टाकण्यात येत आहेत. विविध प्रकारची नशा येथे येऊन केली जात आहे. तसेच येथे अनैसर्गिक अश्लील कृत्य केले जात असल्याचे पाहिल्यानंतर आता सोसायटीत राहणाऱ्या महिला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही या लोकांना हटकल्यास आम्हाला धमकाविण्याचे प्रकार घडले आहेत. पोलिसांकडे तक्रार केल्यावर डुक्कर मारून आमच्या सोसायटीच्या आवारात टाकले जात आहे. अश्लील शेरेबाजीमुळे महिलांना सोसायटीच्या आवारात मॉर्निंग वॉक करणेदेखील अशक्य झाले आहे. सोसायटीतून एकट्याने बाहेर पडण्यासही आता आम्हाला भीती वाटत असल्याचे या गृहसंकुलात राहणाऱ्या डॉक्टर रितू अवस्थी यांनी ‘सीविक मिरर’शी बोलताना सांगितले.
महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नामुळे आम्ही हे अतिक्रमण काढण्याची मागणी करीत आहोत. प्रशासनाकडून विविध कारणांनी कारवाई पूर्ण होऊ शकलेली नाही. अतिक्रमण कारवाईसाठी ड्रोन सर्व्हे झाल्यावर येथे दहा नव्या झोपड्या झाल्या. अनेक अवैध उद्योग येथे सुरू असल्याने आमच्या सुरक्षेबरोबरच अस्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे हा भूखंड प्रशासनाने लवकर मोकळा करावा, अशी आमची मागणी आहे.
– अभिजित गरड, सचिव, ऱ्हिदम सोसायटी.
ऱ्हिदम सोसायटीने आम्हाला अतिक्रमण निर्मूलनासंदर्भात पत्र दिले. तसेच आयुक्तांची भेट घेतली. परंतु, हा भूखंड पीएमआरडीएच्या मालकीचा असल्याने आम्ही त्याबाबत त्यांना पत्र पाठविले आहे. आमच्या अखत्यारित असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
- उमाकांत गायकवाड, सहायक आयुक्त ‘ड’ प्रभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
सोसायटीच्या कंपाऊंडला लागून असलेल्या झोपडपट्टीबाबत आमच्याकडे थेट तक्रार आलेली नाही. झोपडपट्टी भागात आमची गस्त सुरूच असते. नागरिकांनी निनावी तक्रार दिली तरी आम्ही कारवाई करू. पीएमआरडीएकडून नव्याने वसलेल्या ५०-६० झोपड्या काढण्यासाठी मुदत दिली आहे. पीएमआरडीएबरोबर आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली असून, अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही आवश्यक बंदोबस्त पुरविणार आहोत.
– सत्यवान माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे