मोहसीन शेख व धनंजय देसाई
सीविक मिरर ब्यूरो
संगणक अभियंता मोहसीन शेख याच्या खूनप्रकरणात हिंदूराष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय जयराम देसाई याच्यासह २१ जणांची पुणे सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. २७) सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. विशेष न्यायाधीश एस. बी. साळुंखे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
फेसबुकवर महापुरुषांची बदनामी झाल्यानंतर हडपसर भागात २ जून २०१४ रोजी दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये मोहसीन शेख (वय २६, रा. हडपसर) याचा खून झाला होता. याबाबत मोहसीनचा भाऊ मोबिन महम्मद सादिक शेख याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अमीन हरुन शेख (वय ३०, रा. हडपसर) आणि एजाज याकूब बागवान (वय २५, रा. सोलापूर) या दोघांनाही जमावाने जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता, असे फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार देसाई याच्यासह २१ आरोपींना अटक झाली होती.
देसाईतर्फे ॲॅड. मिलिंद पवार आणि इतर आरोपींतर्फे ॲॅड. जे. एन. पाटील, ॲॅड. सुधीर शहा, ॲॅड. डी. एस. भोईटे, ॲॅड. मनीष पाडेकर यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲॅड. एन. डी. पाटील यांनी युक्तिवाद केला. सरकार पक्षातर्फे १७ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविल्या होत्या. जून २०१४ च्या दरम्यान विधानसभा, लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यामुळे फक्त राजकीय दबावामुळे या गुन्ह्यात देसाई यांना गोवले गेले, असा युक्तिवाद ॲॅड. पवार यांनी केला होता.
‘‘२०१४ मध्ये शिवाजी महाराज यांची विटंबना केली होती. खरे आरोपी शोधायचे सोडून त्यावेळी सरकारने त्यांच्या सोयीचे आरोपी शोधले होते,’’ असा आरोप देसाईने निकालावर प्रतिक्रिया देताना केला. तो म्हणाला, ‘‘आपली सत्ता जाणार, हे आघाडी सरकारला माहीत होते. म्हणून तेव्हाच्या सरकारने पोलिसांचा वापर करून खोटे आरोपी तयार केले. आज न्यायालयाच्या लक्षात आले की ही खोटी केस आहे. हिंदूराष्ट्र सेनेच्या २० जणांना वेठीस धरलं होतं. आज सगळे साक्षीदार खोटे निघाले आहेत.’’
मूळचा सोलापूरचा असलेला मोहसीन पुण्यात आयटी कंपनीत काम करत होता. २ जूनला मोहसीन हा भाऊ आणि इतर मित्रांसह नमाज पढण्यासाठी हडपसर भागातील एका मशिदीत गेला होता. त्यावेळी त्याच्या डोक्यावर टोपी होती. तेवढ्यात मोटरसायकलवरून काहीजण आले आणि त्यांनी मोहसीनवर हल्ला केला. मोहसीनवर हल्ला केलेल्या व्यक्ती हिंदूराष्ट्र सेनेचे कार्यकर्ते असल्याचं स्पष्ट झालं. कार्यकर्त्यांनी अचानक मोहसीन आणि त्याच्या मित्रांवर हल्ला चढवला. त्यावेळी क्रिकेटच्या बॅटनं मोहसीनला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने मोहसीनचा मृत्यू झाला.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. मात्र, पुढे ॲॅड. निकम यांनी अचानक या प्रकरणातून विशेष सरकारी वकील म्हणून काम करणं थांबवलं होतं. त्यावेळी फेसबुक आणि सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्यानं तणाव निर्माण झाला होता. धनंजय देसाईने त्याच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांसमोर चिथावणीखोर भाषण दिल्याने या कार्यकर्त्यांनी मोहसीनची हत्या केल्याचा आरोप होता.