अदानींच्या कंपनीवर पीएमपीचा ‘हवाला’

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सात ठिकाणी खासगी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डेक्कन जिमखाना, हिंजवडी, पूलगेट यासह सात मोक्याच्या जागा निश्चितही करण्यात आल्या आहेत. या जागांची पीएमपी व अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे पाहणी केली आहे. सध्या दोन्ही शहरांमध्ये वाढत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगच्या सुविधा नाहीत. त्यामुळे या चार्जिंग स्टेशनला मोठा प्रतिसाद मिळून पीएमपीची तूट कमी करण्यासाठी त्याचा फायदा होईल, असा दावा पीएमपीकडून केला जात आहे.

शहरांमध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय

इलेक्ट्रिक बससाठी पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सात खासगी चार्जिंग स्टेशनची करणार उभारणी

राजानंद मोरे

rajanand.more@civicmirror.in

TWEET@rajanandmirror

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये सात ठिकाणी खासगी इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी डेक्कन जिमखाना, हिंजवडी, पूलगेट यासह सात मोक्याच्या जागा निश्चितही करण्यात आल्या आहेत. या जागांची पीएमपी व अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे पाहणी केली आहे. सध्या दोन्ही शहरांमध्ये वाढत असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी सार्वजनिक ठिकाणी चार्जिंगच्या सुविधा नाहीत. त्यामुळे या चार्जिंग स्टेशनला मोठा प्रतिसाद मिळून पीएमपीची तूट कमी करण्यासाठी त्याचा फायदा होईल, असा दावा पीएमपीकडून केला जात आहे.

अदानी समूहात आर्थिक गडबड सुरू असल्याचे न्यूयॉर्कस्थित हिंडेनबर्ग रीसर्चने आपल्या अहवालात म्हटले आहे. त्यावरून जागतिक मंचावरील वातावरण चांगले तापले आहे. अदानींच्या विरोधात अविश्वासाचे वातावरण तयार होत आहे. या घटना सुरू असताना पीएमपीने चार्जिंग स्टेशनसाठी अदानी टोटल गॅस लिमिटेड या अदानी समूहातील कंपनीशी करार करत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. पीएमपीकडून सात ठिकाणी ९०० ते १२०० चौरस फूट जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्या बदल्यात पीएमपीला ३२.५० टक्के उत्पन्न मिळणार आहे. ही सुविधा चोवीस तासांसाठी उपलब्ध होणार असल्याने ई-वाहनांचा प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा पीएमपी प्रशासनाला आहे. सर्व चार्जिंग स्टेशन उभारणीचा खर्च तसेच त्याची देखभाल-दुरुस्ती, नियोजन ही सर्व जबाबदारी कंपनीवर राहणार आहे.

महापालिकेकडून पीएमपीला मिळालेल्या जागांवर चार्जिंग स्टेशन्स असतील. त्यामध्ये बसस्थानकांसह मोकळ्या जागा तसेच आगारांचाही समावेश आहे. डेक्कन जिमखाना व पूलगेट या शहरातील मोक्याच्या बसस्थानकांवरही चार्जिंग स्टेशन असणार आहेत. या जागा अंतिम करताना वाहनांना ये-जा करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी, त्यांची गैरसोय होऊ नये याचा विचार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामध्ये डेक्कन जिमखाना व पूलगेटसह हिंजवडी, कात्रज, बाणेर-सूस रस्ता, भोसरी, हिंजवडी फेज २ या ठिकाणांचा समावेश आहे. यापैकी एक जागा पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड, एक जागा पीएमपी आणि पाच जागा पुणे महापालिकेच्या आहेत. त्या जागांसाठी पीएमपीकडून ना हरकत प्रमाणपत्र घेण्यात आले आहे.

पीएमपी व कंपनीकडून सर्व तांत्रिक बाबींची चाचपणी तसेच जागांची पाहणीही पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार वर्क ऑर्डरही देण्यात आली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनीही याला दुजोरा दिला. सर्व स्टेशन्स पीएमपीच्या किंवा महापालिकेच्या जागेतच असणार असून यापुढेही त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यास आणखी स्टेशन्स वाढविले जाऊ शकतात. पुण्यात ई-वाहनांची संख्या वाढत चालली आहे. त्यांच्यासाठी सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स कमी आहेत. त्यादृष्टीने त्यांना सुविधा देण्यासाठी पीएमपीने तयारी केली आहे.  

दरम्यान, पीएमपीने संचलन तूट भरून करण्यासाठी ई-चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला असला तरी निवडण्यात आलेल्या जागांवर प्रवाशांकडून नाराजी निर्माण होऊ शकते. डेक्कन जिमखाना, कात्रज, पूलगेट परिसरात आधीच पीएमपी गाड्या उभ्या करण्यासाठी जागा अपुरी पडते. त्यातच चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यानंतर या परिसरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढून तिथे कोंडी होण्याची शक्यता आहे, पण सध्याची ई-वाहनांची संख्या पाहता गर्दी होणार नाही, असा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात आहे.

अदानी टोटल गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर येत्या दोन दिवसांत बैठक होणार आहे. त्यात चार्जिंग स्टेशन्स कधीपर्यंत कार्यान्वित होतील, हे निश्चित होईल. चार्जिंग स्टेशनच्या सात जागांपैकी एकच जागा पीएमपीच्या मालकीची आहे. एक जागा कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि पाच जागा महापालिकेच्या आहेत. त्यांच्याकडून स्टेशन्स उभारण्यासाठी परवानगी घेतली आहे, अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.

 

अदानी टोटल गॅस कंपनीला वर्क ऑर्डर दिली आहे. पुढील दोन दिवसांत कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्यांनी नुकतीच संबंधित जागांची तांत्रिक पाहणी केली असून त्यावर चर्चा होईल. या बैठकीत कामाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.  

- ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story