पुणे : दुसऱ्याचे भांडण तिसऱ्याचा खून; पती-पत्नीची भांडणे सोडवायला गेलेल्याचा मारहाणीत मृत्यू

शेजारीच राहणाऱ्या वयस्क नवरा-बायकोमध्ये सुरू असलेली भांडणे सोडविणे एका तरुणाच्या जीवाशी आले. भांडणे सोडविताना शिवीगाळ केल्यानंतर भांडणे करणाऱ्या दांपत्याच्या मुलाने साथीदारांना घेऊन या तरुणाला बेदम मारहाण केली.

Pune Crime News

संग्रहित छायाचित्र

पुणे : शेजारीच राहणाऱ्या वयस्क नवरा-बायकोमध्ये सुरू असलेली भांडणे सोडविणे एका तरुणाच्या जीवाशी आले. भांडणे सोडविताना शिवीगाळ केल्यानंतर भांडणे करणाऱ्या दांपत्याच्या मुलाने साथीदारांना घेऊन या तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास खडकी येथील मुळा रस्ता येथे घडली. (Pune News) 

प्रशांत नारायण शिंदे (वय ४५, रा. माधवनगर, धानोरी, विश्रांतवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अभय विलास शेलार (वय ३४, रा. मुळा रस्ता, आदर्शनगर, खडकी),  पुनीत विजय यादव (वय ३९), अभिजीत विजय यादव (वय ३७), निखिल सुनील गायकवाड (वय ३४) यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी  विनोद नारायण शिंदे (वय ४३) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रशांत हे रंगकाम करायचे. तर, आरोपी शेलार हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तर, पुनीत आणि अभिजीत यांचा व्यवसाय आहे. तर, निखिल हा बजाज शोरूममध्ये काम करतो. 

विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक कांचन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत शिंदे आणि आरोपी अभय शेलार एकमेकांच्या शेजारी राहण्यास आहेत. शेलारच्या आई-वडिलांमध्ये शुक्रवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास कौटुंबिक कारणावरून वाद सुरू झाले होते. ही भांडणे सुरू असतानाच शेलारची आई प्रशांतच्या घरी गेली. नवऱ्याची समजूत काढण्याची विनंती तिने केली. या महिलेसोबत प्रशांत त्यांच्या घरी गेला. त्यावेळी शेलारच्या वडिलांना त्याने भांडणे करू नका असे समजावून सांगितले. त्यावेळी प्रशांत दारू प्यायलेला होता. नशेत असलेल्या प्रशांतने शेलारच्या वडिलांना समजावत असतानाच शिवीगाळ केली. त्याचा राग आल्याने ही घटना वडिलांनी मुलाला सांगितली. 

चिडलेल्या शेलारने रात्री साडेदहाच्या सुमारास त्याचे मित्र असलेल्या निखिल, अभिजीत, सुमित यांना सोबत घेतले. प्रशांतला एकटे गाठून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी ही भांडणे कशीबशी सोडवून जखमी प्रशांतला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, प्रशांत अत्यवस्थ असल्याची  माहिती समजताच आरोपी पसार झाले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे उपायुक्त विजयकुमार मगर, विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त आरती बनसोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा दाखल केला. मध्यरात्री या चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मोहन खंदारे करीत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest